महिला दिनादिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना
बेळगाव ; महिलादिन दिवशीच एका महिलेने आपल्या तीन मुलींसह फिनेल पिऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ माजली असून अत्यवस्थ महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सरस्वती अदृशप्पा हंपण्णावर (वय 40), मुलगी सृष्टी (वय 14), साक्षी (वय 8), सान्वी (वय 3, सर्व रा. अनगोळ) अशी त्यांची नावे आहेत. हा प्रकार उघडकीस येताच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या माय-लेकरांना रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले. उपलब्ध माहितीनुसार सरस्वतीचा पती अदृशप्पाने कुटुंब चालविण्यासाठी अनेक ठिकाणी कर्ज उचलले आहे. सावकारांच्या त्रासामुळे सध्या तो बेपत्ता आहे. त्यामुळे तीन मुलींची जबाबदारी सरस्वतीवर पडली आहे. घरची परिस्थिती हलाखीची आहे. पती घरात नसला तरी वसुलीसाठी सावकारांच्या फेऱ्या सुरूच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली अवस्था सांगण्यासाठी सरस्वती तिन्ही मुलींसमवेत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील हे कार्यालयात नव्हते. आपल्या तीन मुलींना ज्यूस प्या, असे सांगत तिने फिनेल पाजविले. स्वत:ही फिनेल प्यायली. त्यानंतर त्या अत्यवस्थ झाल्या. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची नोंद पोलिसात झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तम उपचार देण्याची सूचना
यासंबंधी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सरस्वती व तिच्या मुलींना उत्तम उपचार देण्याची सूचना बिम्स् प्रशासनाला केली आहे. या चौघी जणी सुखरुप असून त्यांच्या जीवाला धोका नाही, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून ही घटना आपल्या कार्यालयाच्या आवारात झाली नाही तर कार्यालयाजवळील बस थांब्यानजीक झाल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.