ताराबाई पार्क शेजारील डिमार्ट दारात आढळला मृतदेह
कोल्हापूर प्रतिनिधी
भुलीच्या इंजेक्शनची अतिरिक्त मात्रा घेवून अपुर्वा प्रविणचंद्र हेंद्रे (वय 30 रा. ताराबाई पार्क) या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात झाली. रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबतची माहिती अशी, सुप्रसिद्ध डॉक्टर प्रविणचंद्र हेंद्रे यांची मुलगी अपुर्वा या एमएसचे शिक्षण घेवून सध्या डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये लेक्चरर होत्या. शनिवारी रात्री पार्टी आटोपून 1 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता त्या घरातून बाहेर पडल्या. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ताराबाई पार्क येथील डी मार्टच्या दारात तरुणी बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. तेथील नागरीकांनी या घटनेची माहिती शाहुपुरी पोलिसांना दिली. याच दरम्यान डॉ. हेंद्रे हे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले होते. साहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले हे पथकासमवेत डॉ. हेंद्रे यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ती तरुणी अपुर्वा असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला होता. विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्या पश्च्यात वडील, आई, भाउ असा परिवार आहे.
विरोनियमचे इंजेक्शन
अपुर्वा ऑफीस स्टाफ सोबत पार्टीसाठी गेल्या होत्या. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका डॉक्टर सहकाऱ्याने त्यांना घरी सोडले. त्यानंतर 2 वाजता त्या घरातून बाहेर पडल्या. या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. भूल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विरोनियम इंजेक्शनची बाटली, सिरींज अपुर्वाच्या मृतदेहाशेजारी आढळली. विरोनियमची मात्रा 10 सिसीपेक्षा जास्त झाल्यास मृत्यू ओढावू शकतो. इंजेक्शन घेतल्यापासून 3 ते 4 मिनीटातच मेंदू, व हदय ब्लॉक होवून काही क्षणातच मृत्यू होतो.