संशयास्पद मृत्यूप्रकरणाची नोंद
प्रतिनिधी/ बेळगाव
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील एका कापड दुकानात काम करणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यूप्रकरणाची नोंद झाली आहे.
शामराज फकिराप्पा पट्टणशेट्टी (वय 36, रा. पेठ गल्ली, हिरेबागेवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.05 यावेळेत शामराजने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
हा प्रकार उघडकीस येताच साडी कापून त्याला वाचविण्याचा प्रयत्न झाला. हिरेबागेवाडी येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. इस्पितळाला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीआरपीसी कलम 174(सी) अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक अमरेश बी. पुढील तपास करीत आहेत.
यासंबंधी शामराजची पत्नी ज्योती हिने फिर्याद दिली आहे. शामराज गावातील एका कापड दुकानात काम करीत होता. त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचा उलगडा झाला नाही, म्हणून पत्नीने संशय व्यक्त केला आहे. पोलीस तपासाअंती निश्चित कारण समजणार आहे.