पोवारवाडीतील तिसऱ्या आत्महत्येमुळे ग्रामस्थ सुन्न
वाकरे/प्रतिनिधी
वाकरेपैकी पोवारवाडी (ता. करवीर) येथील एका युवकाने कोणतेही कारण नसताना मंगळवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.नितीन विलास मोरे (वय २०) असे मृताचे नाव आहे.पोवारवाडीतील तिसऱ्या युवकाने आत्महत्या केल्याने ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नितीन मोरे हा दुचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत होता.सोमवारी एका निवडणुकीच्या निकालानंतर तो गावातील विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत सामील झाला होता.मिरवणुकीनंतर तो उमेदवाराच्या घरी जेवायला गेला असेल असा घरच्यांचा समज झाला.मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली,मात्र बराच वेळ तो आढळून आला नाही. शेवटी त्यांनी रात्री दोनच्या सुमारास शेजारी असणाऱ्या जनावरांच्या गोठयात पाहिले असता त्याने दोरीने गळफास घेतल्याचे लक्षात आले.त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेची पोलिसांना घटनेची माहिती कळवण्यात आली.पंचनामा करून त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला.मंगळवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतेही कारण नसताना नितीनने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
पोवारवाडीत तिसऱ्या युवकाची आत्महत्या
गेल्या महिन्यात वाकरेपैकी पोवारवाडीतील एकाच गल्लीतील दोन युवकांनी चार- पाच दिवसात आत्महत्या केली होती, पुन्हा येथील युवकाने आत्महत्या केल्याने ही तिसरी आत्महत्या झाली आहे. युवकांच्या आत्महत्येमुळे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत