ब्राझील
नुकत्याच संपन्न झालेल्या ब्राझील पॅरा 2022 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तृतीय मानांकित बॅडमिंटनपटू सुकांत कदमने एसएल-4 विभागामध्ये रौप्यपदक पटकाविले. तसेच भारताच्या प्रमोद भगतने दोन कांस्यपदके मिळविली.
पुरूषांच्या एसएल-4 विभागातील उपांत्य फेरीच्या सामन्यात सुकांत कदमने जर्मनीच्या ऍडॅमचा 21-19, 21-13 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्यानंतर अंतिम सामन्यात त्याला भारताच्या तरूणने पराभूत केल्याने सुकांतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तरूणने सुकांतचा 21-17, 20-22, 21-18 असा पराभव केला. भारताच्या टॉप सीडेड प्रमोद भगतला कुमार नितेशकडून हार पत्करावी लागली. 50 मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यात कुमार नितेशने विश्वविजेत्या प्रमोद भगतचा 21-7, 19-21, 21-19 असा पराभव केला. या पराभवामुळे प्रमोदला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत प्रमोद भगत आणि पलक कोहली यांनी कांस्यपदक मिळविले. त्यांना जपानच्या फुजिहारा आणि सुगिनो यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.