ट्रस यांना 28 टक्क्यांची आघाडी ः कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीतील अंतर्गत निवडणूक
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रारंभी सुनक यांना कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या 137 खासदारांचे समर्थन मिळाले होते. लिझ ट्रस यांना 113 खासदारांचे समर्थन प्राप्त करता आले होते. परंतु आता अंतिम टप्प्यात पक्षाचे सुमारे 2 लाख स्थायी सदस्य मतदान करणार असून यातूनच नव्या पंतप्रधानाची निवड होणार आहे.
पक्षाच्या स्थायी सदस्यांपैकी 96 टक्के हे श्वेतवर्णीय आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या युगोव्ह पोलमध्ये ट्रस यांनी सुनक यांच्यावर 28 टक्क्यांची आघाडी मिळविली आहे. ट्रस यांना 58 टक्के तर सुनक यांना 30 टक्के मते प्राप्त झाली आहेत. पक्षाच्या स्थायी सदस्यांच्या समर्थनात सुनक हे मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. तर एका अन्य सर्वेक्षणानुसार पक्षाच्या दर 10 पैकी 6 सदस्य ट्रस यांच्यासोबत आहेत.
सुनक आणि ट्रस मत मागण्यासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या सदस्यांना सामोरे जात आहेत. या प्रकाराला ‘हस्टिंग्स’ म्हटले जाते. एक्सिटर, कार्डिफ आणि ईस्टबोर्नमध्ये या प्रकारच्या हस्टिंग्समध्ये पक्षाच्या सदस्यांदरम्यान सुनक यांची प्रतिमा माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा विश्वासघात करत सत्ता प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा नेता अशी तयार होत असल्याचे समजते. जॉन्सन यांना पंतप्रधानपद गमवावे लागण्यामागे सुनक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. सुनक यांनीच राजीनामा देत जॉन्सन यांच्या नेतृत्वाला विरोध दर्शविला होता.
कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीत 96 टक्के श्वेतवर्णीय सदस्यांपैकी 21 टक्के रुढीवादी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टशी जोडले गेलेले आहेत. या सदस्यांचा सुनक यांना पाठिंबा मिळणे अवघड आहे. पक्षाचे श्वेतवर्णीय सदस्य हेच सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मागे पडण्याचे खरे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या 68 टक्के सदस्यांचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश जण श्वेतवर्णीय उमेदवारालाच मत देणे पसंत करतात.