गोलंदाजीत भुवनेश्वर-टी. नटराजन, फलंदाजीत अभिषेक-केन विल्यम्सन विजयाचे शिल्पकार
नवी मुंबई / वृत्तसंस्था
केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबादने सोमवारी आयपीएल साखळी सामन्यात गुजरात टायटन्सला 8 गडी व 5 चेंडूंचा खेळ बाकी राखत पराभवाचा जोरदार धक्का दिला. गुजरातने निर्धारित 20 षटकात 7 बाद 162 धावा केल्यानंतर सनरायजर्सने 19.1 षटकात 2 बाद 168 धावांसह विजय संपादन केला.
विजयासाठी 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादतर्फे अभिषेक शर्मा (32 चेंडूत 42) व केन विल्यम्सन (46 चेंडूत 57) यांनी 8.5 षटकात 64 धावांची उत्तम सलामी देत विजयाची भक्कम पायाभरणी केली. रशिद खानने अभिषेकला साई सुदर्शनकरवी झेलबाद केले. पण, तोवर अभिषेकने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. राहुल त्रिपाठी 17 धावांवर निवृत्त झाला आणि त्यानंतर निकोलस पूरन (18 चेंडूत नाबाद 34) व मॅरक्रम (8 चेंडूत नाबाद 12) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. पूरनने बॅकवर्ड स्क्वेअरलेगकडे उत्तुंग षटकार खेचत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हार्दिक पंडय़ाची अर्धशतकी खेळी
तत्पूर्वी, कर्णधार हार्दिक पंडय़ाच्या नाबाद 50 धावांच्या समयोचित खेळीमुळे गुजरात टायटन्सला आघाडी फळीच्या अपयशानंतरही निर्धारित 20 षटकात 7 बाद 162 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचता आली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरातचे पहिले 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले. मात्र, त्यानंतर हार्दिकने डेव्हिड मिलरसह (12) चौथ्या गडय़ासाठी 40 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी, गुजरातचा संघ एकवेळ 8 षटकात 3 बाद 64 अशा अडचणीत होता.
हार्दिकने नंतर अभिनव मनोहरसमवेत 50 धावा जोडल्या. 2.60 कोटी रुपयांना करारबद्ध केल्या गेलेल्या अभिनव मनोहरने अवघ्या 21 चेंडूत 35 धावांची आतषबाजी केली. त्याच्या या योगदानामुळे गुजरातला 150 धावांचा टप्पा सर करता आला. एक-दोन नव्हे तर तब्बल 3 जीवदाने लाभलेल्या मनोहरने त्याच्या छोटय़ा खेळीत 5 चौकार व 1 षटकार फटकावले. त्याने विशेषतः टी. नटराजनच्या डावातील 18 व्या षटकात केलेले आक्रमण लक्षवेधी होते. त्या षटकात गुजरातने 13 धावा वसूल केल्या.
त्या तुलनेत अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने बचाव व आक्रमणाचा उत्तम मिलाफ साधत शानदार अर्धशतक साजरे केले. त्याने टी. नटराजनला स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली. त्यानंतर उमरान मलिकच्या डावातील 8 व्या षटकात सलग 2 चौकारांसह एकूण 9 धावा मिळवल्या. त्यानंतर एडन मॅरक्रमला त्याने काऊ कॉर्नरकडे खेचलेला षटकार विशेष लक्षवेधी ठरला.
अर्थात, एकीकडे हार्दिक उत्तम फटकेबाजी करत असताना दुसरीकडे, त्याचे सहकारी फलंदाज मात्र ठरावीक अंतराने बाद होत राहिले. शेवटच्या 5 षटकात हैदराबादच्या गोलंदाजांनी नियंत्रित टप्प्यावर मारा करण्यावर भर दिला आणि यामुळे आक्रमक फलंदाजीवर मुरड घालणे भाग पडलेल्या हार्दिकने आयपीएलमधील सर्वात संथ पाचवे अर्धशतक नोंदवले. प्रारंभी, मॅथ्यू वेडने भुवनेश्वरच्या पहिल्या षटकात 17 धावा वसूल केल्या. यातील चक्क 12 धावा अवांतर राहिल्या.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स ः 20 षटकात 7 बाद 162 (हार्दिक पंडय़ा 42 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह नाबाद 50, अभिनव मनोहर 21 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 35, डेव्हिड मिलर 12, मॅथ्यू वेड 19, साई सुदर्शन 11. अवांतर 22. भुवनेश्वर कुमार 4 षटकात 2-37, टी. नटराजन 4 षटकात 2-34, मार्को जान्सन, उमरान मलिक प्रत्येकी 1 बळी). सनरायजर्स हैदराबाद ः 19.1 षटकात 2 बाद 168 (अभिषेक शर्मा 32 चेंडूत 6 चौकारांसह 42, केन विल्यम्सन 46 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह 57, राहुल त्रिपाठी 17 वर निवृत्त, निकोलस पूरन 18 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 34, मॅरक्रम 8 चेंडूत नाबाद 12. अवांतर 6. हार्दिक पंडय़ा, रशिद खान प्रत्येकी 1 बळी).