महापौरांना निवेदन सादर
बेळगाव : परराज्यांतून येवून स्थायिक झालेल्या रहिवाशांना सर्व सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मात्र शहराच्या विकासात योगदान असलेल्या भूमिपुत्रांना सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. सध्या घरगुती गॅसचा दर गगनाला भिडला असून, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे गॅस पाईपलाईनद्वारे गांधीनगर परिसरात गॅसपुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सूरज कणबरकर यांनी महापौरांना सादर केले. प्रत्येक सुविधा उपलब्ध करताना गांधीनगरला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. शहरातील उपनगरांतून गॅसवाहिन्यांद्वारे गॅसपुरवठा केला जात आहे. मात्र गांधीनगर परिसरात ही सुविधा अद्याप उपलब्ध केली नाही. सध्या गॅस सिलिंडरचा दर 1300 रु. झाला. पण गॅसवाहिन्यांद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या गॅसचे बिल प्रतिमहिना 400 रु. इतके येते. पण ही सुविधा गांधीनगरवासियांसाठी उपलब्ध केली नसल्याने येथील रहिवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. बेळगावच्या विकासात गांधीनगरचा सहभाग खूप मोठा आहे. आम्ही स्थानिक भूमीपुत्र आहोत. पण आमच्यावरच अन्याय होतो. त्यामुळे बेळगावच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर शोभा सोमनाचे यांनी या समस्येचे निवारण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व गांधीनगरचे रहिवासी सूरज कणबरकर यांनी निवेदन दिले.