नितीश कुमार यांच्या पक्षाच्या भूमिकेकडे होते लक्ष
वृत्तसंस्था/ पाटणा
मागील दोनवेळा घटक पक्षांना राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला समर्थनाच्या नावावर चकवा देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तिसऱयांदा मात्र असे करणे टाळले आहे. संयुक्त जनता दलाने रालोआ उमेदवार द्रौपदी मूर्म यांना समर्थन जाहीर केले आहे. यासंबंधी संजदचे अध्यक्ष ललन सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
संजद अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी बुधवारी दुपारी एका मागोमाग एक दोन ट्विट करत राष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून निवडण्यात आलेल्या उमेदवाराला समर्थन देण्याची घोषणा केली. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा यंदा निवडण्यात आलेल्या उमेदवाराबद्दल कुठलाच आक्षेप नसल्याचे स्पष्ट झाले.
द्रौपदी मूर्म यांच्यासोबतचे छायाचित्र ट्विट करत ललन सिंह यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गरीब कुटुंबात जन्मलेली एक आदिवासी महिला द्रौपदी मूर्म उमेदवार असल्याचे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिला सशक्तीकरण आणि समाजाच्या शोषित वर्गांबद्दल समर्पित राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
2021 साली केंद्रात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीकरता पी.ए. संगमा यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु तेव्हा नितीश यांनी आघाडीच्या विरोधात जात काँग्रेस उमेदवार प्रणव मुखर्जी यांना समर्थन दिले होते. तेव्हापासूनच संजद आणि भाजपच्या संबंधांमध्ये कटूता आली होती. त्यानंतर नितीश यांनी रालोआतून बाहेर पडत लालूप्रसाद यादवांसोबत महाआघाडी केली होती.
2017 साली नितीश हे लालूंसोबतच्या महाआघाडीत असताना काँग्रेसने संपुआच्या वतीने मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी दिली होती. तेव्हा भाजपने बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिली होती. तर नितीश कुमार हे मीरा कुमार यांनाच समर्थन देतील असा विश्वास काँग्रेसला वाटत होता. परंतु नितीश कुमार यांनी दुसऱयांदा राजकीय वर्तुळाला चकित करत रालोआ उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिले होते. परंतु यावेळी भाजपने यशवंत सिन्हा यांच्या विरोधात आदिवासी चेहरा मैदानात उतरविल्याने नितीश यांना अशाप्रकारची विरोधी भूमिका घेण्याची संधीच मिळालेली नाही.