वार्ताहर /जुने गोवे
कुंभारजुवे मतदारसंघातील सातपैकी पांच पंचायतीत आमदार राजेश फळदेसाई यांचे समर्थक पंचसदस्य, सरपंच व उपसरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्यापैकी चार पंचायतीत दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे.
करमळी पंचायतीच्या सरपंचपदी कुटा सालेलकर तर उपसरपंचपदी रेश्मा मुरगावकर, खोर्ली पंचायतीच्या सरपंचपदी विरेश आसोलकर तर उपसरपंचपदी फ्रिडा एमी पो, कुंभारजुवे पंचायतीच्या सरपंचपदी विक्रम परब तर उपसरपंचपदी सचिन गावडे, ओल्ड गोवा सरपंचपदी सॅण्ड्रा गोन्साल्विस तर उपसरपंचपदी विश्वास कुट्टीकर या सर्व राजेश फळदेसाई समर्थकांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडून आलेले सर्वजण चांगले सुशिक्षित, धडाडीचे व समाजकार्याची जाण असलेले असून आता मतदारसंघाचा विकास जलदगतीने होईल, असे प्रतिपादन आमदार राजेश फळदेसाई यांनी केले.