ऑनलाईन टीम/तरुण भारत
सर्वोच्च न्यायालयामध्ये (supreme court) घटनापीठापुढे होणाऱ्या सुनावण्याचं थेट प्रक्षेपण आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून केलं जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस जारी करुन न्यायालयाच्या कामकाजासंदर्भातील खंडपीठाला याबद्दलचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून घटनापीठापुढील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष (maharashtra political crisis), आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणीपासून या थेट प्रक्षेपणाला सुरुवात झाली आहे. प्रथम शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. यांनतर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. ही सर्व सुनावणी आपल्या मोबाईलवर ऑनलाईन पाहता येणार आहे. तर न्यायालयाने वृत्तवाहिन्यांना या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घातली आहे.
सर्वोच्च न्यायालयातील हे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय माहिती केंद्र म्हणजेच नॅशनल इनफॉर्मेटीक्स सेंटरच्या (एनआयसीच्या) माध्यमातून वेबकास्ट केलं जात आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच वेबकास्ट डॉट जीओव्ही डॉट इन (webcast.gov.in) वर दिसत आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत यांनी लवकरच सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी या न्यायालयाच्या स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन थेट प्रक्षेपित केल्या जातील अशी माहिती दिली होती. युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण करण्याऐवजी न्यायालय स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन ही सेवा उपलब्ध करुन देईल, असा विश्वास सरन्यायाधिशांनी व्यक्त केला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण केलं जातं आणि नंतर ते स्वत:च्या सर्व्हरवरुन दाखवलं जातं, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकांना त्यांच्या लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि कंप्युटरवर कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
हे ही वाचा : राज्यातील सत्तासंघर्षावर कोर्टाचा निर्णय येण्याआधीच अब्दुल सत्तारांच मोठं विधान