खटला स्थानांतरित करण्याची मागणी फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. आपल्याविरोधात नोंद उत्तरप्रदेशातील काही खटले अन्य राज्यांमध्ये स्थानांतरित करावेत अशी मागणी आझम यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली आहे.
उत्तरप्रदेशात मला न्याय मिळणार नाही. राज्य सरकारकडून माझा छळ केला जात असल्याचा दावा आझम यांनी वकील कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून केला होता. यावर सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायाधीश पी.एस. नरसिंह तसेच एस.ए. नजीर यांच्या खंडपीठाने आझम यांच्याविरोधातील खटले स्थानांतरित करण्यासाठी ठोस कारणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. एका खटल्यात दोषी ठरल्याने आझम यांना अलिकडेच विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले आहे.