वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींना फटकारले आहे. सोशल मीडियावर न्यायपालिकेच्या विरोधात ललित मोदींनी केलेल्या टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना बिनशर्त माफी मागण्याचा निर्देश दिला आहे. ललित मोदी हे कायदा आणि संस्थेपेक्षा वरचढ नाहीत. ललित मोदींकडून दाखल प्रतिज्ञापत्राबद्दल आम्ही संतुष्ट नसल्याचे न्यायाधीश एम.आर. शाह आणि सी.टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. तसा खंडपीठाने आयपीएलच्या माजी आयुक्तांना सोशल मीडिया आणि प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांमधूनही माफी मागण्याचा निर्देश दिला आहे. माफी मागण्यापूर्वी ललित मोदींनी एक प्रतिज्ञापत्र सादर करावे आणि यात भविष्यात भारतीय न्यायपालिकेची प्रतिमा मलीन करणारी कुठलीच पोस्ट करणार नसल्याचे नमूद करावे असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.