प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथील स्कीम क्रमांक 61 साठी शेतकऱयांच्या जमिनी घेण्यात आल्या होत्या. मात्र जवळपास 25 एकरमधील शेतकऱयांनी जमिनी देण्यास नकार दिला. त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तरी देखील बुडा ही जमीन घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला विरोध केला आहे. शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शनिवारी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जागेवर जाऊनच सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आठवडय़ात सर्व्हे केला जाणार आहे.
कणबर्गी येथील शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरूच आहे. शेतकऱयांनी या अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेतली असताना बुडा वारंवार कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी बुडा कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले होते. आपल्या कुटुंबासह शेतकऱयांनी बुडा कार्यालयासमोर ठाण मांडल्यानंतर बुडाच्या अधिकाऱयांनी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार शेतकऱयांची सरकारी विश्रामधाम येथे बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱयांच्या जमिनीचा पुन्हा सर्व्हे करून जी शेतकऱयांची आहे ती त्यांना दिली जाणार आहे. तसेच बुडाने कब्जात घेतलेल्या जमिनीचाही सर्व्हे होणार आहे. या बैठकीमध्ये शेतकऱयांनी अधिकारी तसेच आमदार अनिल बेनके यांना आम्ही कुठल्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यावर जे शेतकरी जमीन देणार नाहीत, त्यांच्याविषयी पुढील आठवडय़ात जागेवर जाऊनच निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱयांनी सांगितले. यावेळी आमदार अनिल बेनके, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला बबन मालाई, नारायण अष्टेकर, महादेव मालाई, कृष्णा मालाई, नारायण मालाई, मनोहर मालाई, आकाश दसका, निंगाप्पा कोलकार, राजू अष्टेकर, प्रकाश मालाई, मालू मालाई, सुमन मालाई, मल्लव्वा मालाई, इंदू दसका, रामा दसका, भवानी मालाई यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.