राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रामसेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याचा निर्देश सरकारला देण्याची मागणी करणाऱया भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमना, न्यायाधीश कृष्ण मुरारी आणि हेमा कोहाली यांचे खंडपीठ याप्रकरणी सुनावणी करणार आहे. स्वामी यांनी ही याचिका त्वरित सुचीबद्ध करण्याची मागणी 13 जुलै रोजी केली होती.
तामिळनाडूतील पंबन बेट आणि श्ा़खाrलंकेतील मन्नार बेटादरम्यान ‘रामसेतू’ आहे. रामसेतूला ऍडम ब्रिज या नावानेही ओळखले जाते. केंद्र सरकारने रामसेतूचे अस्तित्व मान्य केल्याने खटल्याचा पहिला टप्पा यापूर्वीच जिंकला आहे. संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी 2017 मध्ये माझ्या मागणीवर विचार करण्यासाठी बैठक घेतली होती, परंतु पुढील काळात काहीच घडले नसल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.
संपुआ-1 सरकारकडून हाती घेण्यात आलेला वादग्रस्त सेतुसमुद्रम शिप चॅनेल प्रकल्पाच्या विरोधात स्वामी यांनी जनहित याचिका दाखल करत रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी केली होती. 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सेतुसमुद्रम प्रकल्पाला स्थगिती दिली होती. सेतुसमुद्रम प्रकल्पाला काही राजकीय पक्ष, पर्यावरणतज्ञ आणि हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध आहे.