राष्ट्रीय ग्राहक न्यायालयाने दिले होते 2 कोटी देण्याचे आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हॉटेलच्या सलूनमध्ये चुकीच्या पद्धतीने केस कापल्यामुळे महिला मॉडेलला झालेल्या वेदना आणि आर्थिक नुकसानासाठी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा (‘एनसीडीआरसी’) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखला आहे. ‘एनसीडीआरसी’ने हॉटेलला महिलेला 2 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. नुकसान भरपाई देण्यासाठी हॉटेलला 8 आठवडय़ांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
हे प्रकरण एप्रिल 2018 मधील असून त्यावर ‘एनसीडीआरसी’ न्यायालयाने 21 सप्टेंबर 2021 रोजी ग्राहक न्यायालयाने लक्झरी हॉटेल चेन आयटीसीला चुकीच्या पद्धतीने केस कापल्याबद्दल पीडित महिलेला 2 कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण न्यायालयाच्या (एनसीडीआरसी) या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ‘एनसीडीआरसी’ने नुकसान भरपाई निश्चित करण्यापूर्वी कोणतेही पुरावे पाहिले नाहीत, त्यामुळे या प्रकरणाचा नव्याने विचार करून तपास करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच नुकसान भरपाई पीडितेच्या दाव्याच्या आधारे नव्हे तर पुराव्याच्या आधारे निश्चित केली जावी. नुकसान भरपाई कोणत्या आधारावर आणि किती मिळणार? याचा निर्णय ‘एनसीडीआरसी’ने घ्यावा, असे न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. हॉटेलवर महिलेचे केस कापण्यालाच नव्हे, तर केशभूषा करताना वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता.