पुणे / प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिल्लीवरून फोन आला आणि त्यांनी राज्यपालांची पाठराखण करण्यात धन्यता मानली. मात्र, देवेंद्रजी आपल्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यापुढे भाजपला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सुनावले.
पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे घटनास्थळी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, माझी भूमिका ही पक्षाची भूमिका आहे. राज्यपालांवर टीका करणे, ही आपली संस्कृती नाही, पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिकाही दुर्दैवी आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
अधिक वाचा : श्रद्धा हत्याकांडात नवा खुलासा, हत्येनंतर आफताबने मुंबईहून मागवले 37 बॉक्स
नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार
मागील तीन ते चार वर्षांपासून मी नवले ब्रीज परिसरातील विविध दुरुस्ती कामांचा आढावा घेत आहे. येथील तीव्र उतार अद्याप कमी करण्यात आलेला नाही. सदर उतार कशाप्रकारे कमी करता येईल, यादृष्टीने तज्ज्ञांच्या मदतीने उपाययोजना कराव्या लागतील. याबाबत विविध यंत्रणाशी मी बोलणी केलेली असून ते स्वत: सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबतचा अहवाल देतील. यानंतर आपण नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहे.