स्व-खर्चाने रस्त्याची केली दुरुस्ती
वार्ताहर /उचगाव
कल्लेहोळ ते मराठी शाळा या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांची कुचंबणा होत होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्राम पंचायत सदस्य सुरेश नागोजीचे यांनी पुढाकार घेऊन स्व-खर्चाने व श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली. खड्डे बुजविले, चिपिंग टाकून रस्त्यावरील चिखल नाहीसा केला. यामुळे गावातील देवस्थान पंच कमिटी, ग्रामस्थ, ग्राम पंचायत यांच्यावतीने सुरेश नागोजीचे यांचा भगवा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रा. पं. सदस्य अनिल पाटील, रमेश खन्नूरकर, देवस्थान कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सुरेश नागोजीचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ज्या गावामध्ये आपण राहतो, त्या गावाच्या सुधारणेसाठी आपण सर्वांनीच योगदान दिले पाहिजे. गावाची स्वच्छता, सुरक्षितता यासाठी आपण मिळून कार्य करुया आणि गावाची शोभा वाढवूया. ग्रामस्थ, विद्यार्थी यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आपण सतर्क राहूया. अनिल पाटील यांनी स्वागत करून आभार मानले.