वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) म्हणून सुरेश एन. पटेल यांनी बुधवारी शपथ ग्रहण केली आहे. हे पद मागील एक वर्षापासून रिक्त होते. प्रभारी सीव्हीसी म्हणून जूनपासून काम पाहणाऱया पटेल यांना राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवड समितीने पटेल यांना आयोगाचे प्रमुख करण्यास मंजुरी दिली होती.
राष्ट्रपती भवनात बुधवारी सकाळी 10 वाजता आयोजित सोहळय़ात सुरेश पटेल यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली असल्याचे राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध एका निवेदनात म्हटले गेले आहे. या सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू देखील उपस्थित होते.
आंध्र बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पटेल यांना एप्रिल 2020 मध्ये दक्षता आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. माजी आयएएस अधिकारी संजय कोठारी यांनी मागील वर्षी 24 जून रोजी सीव्हीसी म्हणून स्वतःचा कार्यकाळ पूर्ण केला होता.
केंद्रीय दक्षता आयोगाचे नेतृत्व केंद्रीय दक्षता आयुक्त करतात आणि यात दोन दक्षता आयुक्त असतात. सध्या आयोगात कुणीच दक्षता आयुक्त म्हणून नियुक्त नाही. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीने सीव्हीसी आणि दक्षता आयुक्तांच्या संबंधी निर्णय घेण्यासाठी जुलैमध्ये बैठक घेतली होती. समितीच्या अन्य दोन सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधा rपक्षनेत्याचा समावेश असतो.
समितीने आयबीचे माजी प्रमुख अरविंद कुमार आणि माजी अधिकारी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. कुमार आणि श्रीवास्तव दोघांनाही दक्षता आयुक्त म्हणून सीव्हीसी पटेल हे शपथ देणार आहेत. कुमार यांनी 30 जून रोजी आयबी प्रमुख म्हणून स्वतःचा कार्यकाळ पूर्ण केला होता.