ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेपूर्वी काही चाचण्या कराव्या लागणार असल्याने राज ठाकरे आज दुपारीच रुग्णालयात दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
काही दिवसांपूर्वी टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत बळावल्याने डॉक्टरांनी त्यांना हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. पण तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. यामुळे त्यांना ॲनास्थेशिया देण्यात येऊ शकत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, आता राज ठाकरे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. उद्या त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया होईल. या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात येते.