मोरबी पूल दुर्घटना प्रकरण
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातच्या मोरबीमध्ये मागील वर्षी झालेल्या पूल दुर्घटनेप्रकरणी ओरेवा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांनी मंगळवारी न्यायलयात आत्मसमर्पण केले आहे. जयसुख पटेल यांनी मोरबीत मुख्य न्यायदंडाधिकाऱयांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यापूर्वी पटेल हे विदेशात पलायन करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू होती.
मोरबी सस्पेंशन ब्रिज कोसळल्याप्रकरणी 1,262 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत 135 जणांना जीव गमवावा लागला होता. आरोपपत्रात आरोपी म्हणून ओरेवा समुहाचे जयसुख पटेल यांचे नाव सामील करण्यात आले आहे. जयसुख पटेल यांनी मोरबी सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तसेच पीडित कुटुंबाच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
मोरबीतील 140 वर्षे जुना सस्पेंशन ब्रिज 30 ऑक्टोबर रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत 135 जणांना जीव गमवावा लागला होता. पूल कोसळण्यापूर्वी त्यावर 400 हून अधिक लोक होते, तर पूलाची क्षमता केवळ 100 लोकांपुरती होती.