पंधरा दिवसांचा अल्टिमेटम : कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात अद्यापही अनधिकृत भोंग्यांवर कारवाई झालेली नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा अधिक आवाजात भोंगे लावले जात असल्याने श्रीराम सेना आक्रमक झाली असून बुधवारी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. उत्तर भागातील भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांना अल्टिमेटम देण्यात आला.
मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न मागील काही दिवसांत चर्चेचा मुद्दा ठरला. श्रीराम सेनेने हा प्रश्न लावून धरत अनेक आंदोलने केली. यामुळे शहरातील भोंग्यांवर काही प्रमाणात मर्यादा आल्या. परंतु अद्याप काही ठिकाणी अनधिकृत भोंगे असून आवाजाची मर्यादा पाळली जात नसल्याने श्रीराम सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. पोलीस प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्रीराम सेनेने दिला आहे.
अनिल बेनके यांनी निवेदन स्वीकारून 16 जूनपूर्वी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करून अनधिकृत भोंग्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवीकुमार कोकितकर, विनय अंग्रोळी, नागेश सरप, विनायक हंगीरगेकर, कुशल अंबोळकर, अजित पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.