Tarun Bharat

फिश-मटण मार्केटमधील गाळय़ांचे सर्वेक्षण

कसाई गल्लीतील मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम

प्रतिनिधी /बेळगाव

शहर आणि उपनगरात महापालिकेच्या असंख्य खुल्या जागा आहेत. मात्र याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. अनेक खुल्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या असून काही जागांच्या भाडेकराराची मुदत संपूनही महापालिकेकडे उपलब्ध नाही. तसेच काही जागा हडप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून मंगळवारी कसाई गल्ली फिशमार्केटसह मटण मार्केटच्या गाळय़ांचे मोजमाप करण्यात आले.

काही ठिकाणी मनपाने व्यापारी संकुलाची उभारणी करून गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. पण मालमत्तांची माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. शहर व उपनगरात नवीन रस्ते निर्माण करण्यात येतात. खुल्या जागा, उद्यानाची जागा राखीव ठेवण्यात येते. या जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्यात येतात. या जागा ताब्यात घेवून सरकार दप्तरी महापालिकेचे नाव दाखल करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत महापालिकेने काही जागा हस्तांतर करून घेण्याकडे आणि सिटी सर्व्हे कार्यालयात मनपाचे नाव दाखल करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

मालमत्तेला पीआयडी क्रमांक देणार

त्यामुळे अशा सर्व जागांची माहिती घेण्यासाठी मनपाने खुल्या जागांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. शासनाकडून कोणतीही माहिती विचारली असता मालमत्तांची नेंद मनपाकडे नसल्याने व्यवस्थित माहिती देता येत नाही. परिणामी मालमत्ता, खुल्या जागा, स्मशानभूमी, व्यापारी संकुल, गाळे आदी माहिती घेण्यासाठी प्रत्येकवेळी सर्वेक्षण मोहीम राबवावी लागते. काही मालमत्तांची नोंद नसल्याने अतिक्रमण, जागा हडप करणे असे प्रकार वाढण्याचा धोका आहे. नोंद नसल्याने काही जागांबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने जागा गमवाव्या लागत आहेत. त्यामुळे मनपाच्या स्मशानभूमीसह सर्वच मालमत्तांची माहिती जमा करून प्रत्येक मालमत्तेला पीआयडी क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी कागदपत्रे व इतर माहिती जमा करण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती उपलब्ध झाली असून या अंतर्गत मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. सोमवारी कचेरी गल्ली येथील गाळय़ांचे मोजमाप करण्यात आले. तसेच मंगळवारी कसाई गल्ली येथील फिश मार्केट, मटण मार्केट, कत्तलखाना आणि सिंधी मार्केटमधील गाळय़ांची आणि मालमत्तांची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गाळय़ांचे मोजमाप करून त्याची नोंद करण्यात आली.यावेळी इस्टेट ऑफिसर धर्मनाथ कोरी, महसूल निरीक्षक नंदू बांदीवडेकर, संजय पाटील, माने, बसवराज सलकेरी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

अतुल शिरोळे यांना शुभेच्छा

Amit Kulkarni

मलाबारतर्फे ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ योजना सुरू

Omkar B

शुद्ध पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष द्या

Amit Kulkarni

शहरात आज-उद्या वीजपुरवठा होणार खंडित

Amit Kulkarni

मंदिरांवर आता सरकारचा अंमल

Amit Kulkarni

शुक्रवारी शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

Amit Kulkarni