वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा मध्यफळीतील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला असून त्याने क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीचा त्याला बढती मिळण्यासाठी लाभ झाला आहे.
नेदरलँड्सविरुद्ध 25 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावत सूर्याने पाकच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत अग्रस्थानी झेप घेतली. अग्रस्थानापर्यंत मजल मारणारा तो भारताचा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी कोहली सप्टेंबर 2014 ते डिसेंबर 2017 यातील विविध कालावधीत मिळून एकूण 1013 दिवस अग्रस्थानावर होता. यादवने एकूण 863 रेटिंग गुण मिळविले असून भारतातर्फे ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी सप्टेंबर 2014 मध्ये कोहलीने 897 रेटिंग गुण मिळविले होते. रिझवानचे 842 तर न्यूझीलंडच्या देव्हॉन कॉनवेचे 792 रेटिंग गुण झाले आहेत.
गेल्या वर्षी मार्चमध्ये भारताच्या टी-20 संघात पदार्पण केल्यानंतर सूर्याने क्रिकेटच्या या अतिझटपट प्रकारात सर्वोत्तम फलंदाज म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे. त्याने 37 सामन्यांत एक शतक व 11 अर्धशतके नोंदवली आहेत. 32 वर्षीय यादवने 13 वनडे सामनेही खेळले आहेत.
ताज्या क्रमवारीत न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने पाच स्थानांची प्रगती करीत आजवरचे सर्वोत्तम सातवे स्थान मिळविले आहे. त्याने लंकेविरुद्ध 104 तर इंग्लंडविरुद्ध 62 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या रिली रॉसोनेही टॉप टेनमध्ये स्थान मिळविले असून 17 स्थानांची प्रगती करीत तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनेही न्यूझीलंडविरुद्धच्या 73 धावांच्या खेळीमुळे 3 स्थानांची बढती मिळविली असून तो आता 14 व्या स्थानावर आहे. अफगाणच्या रहमनुल्लाह गुरबाज (संयुक्त 17), द.आफ्रिकेचा डेव्हिड मिलर (28 वे), लंकेचा भानुका राजपक्ष (29 वे), बांगलादेशचा लिटॉन दास (36 वे), ऑस्ट्रेलियाचे मिशेल मार्श (31 वे) व स्टोइनिस (39) यांनीही क्रमवारीत प्रगती केली आहे.
गोलंदाजांत हसरंगाने पुन्हा अग्रस्थान मिळविले असून अफगाणचा रशिद खान दुसऱया स्थानावर आहे. रशिदपेक्षा तो फक्त 3 गुणांनी पुढे आहे. इंग्लंडचा सॅम करण दोन स्थानांची प्रगती करीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे तर द.आफ्रिकेचा ऍन्रिच नॉर्त्जे 11 स्थानांची बढती मिळवित आठव्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा स्पिनर मिशेल सँटनरही टॉपटेनमध्ये पोहोचला असून त्याचे सहकारी बोल्ट व साऊदी यांनी 12 व 16 वे स्थान मिळवले आहे. भारताच्या अर्शदीप सिंगने या क्रमवारीत 16 स्थानांची प्रगती करीत 27 वे स्थान मिळविले आहे.