वृत्तसंस्था /दुबई
आयसीसीच्या 2022 सालातील क्रिकेटच्या टी-20 प्रकारात पुरुषांच्या विभागात सूर्यकुमार यादव आणि महिलांच्या विभागात स्मृती मानधना यांची सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी शिफारस करण्यात आली आहे.
आयसीसीतर्फे क्रिकेटच्या विविध प्रकारातील पुरुष आणि महिलांची प्रत्येक वर्षी सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन केली जाते. भारतातर्फे सूर्यकुमार यादवने टी-20 प्रकारात यावर्षीच्या क्रिकेट हंगामात फलंदाजीत सातत्य दाखवताना 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने टी-20 प्रकारात 2022 च्या क्रिकेट हंगामाअखेर 187.43 स्ट्राईकरेटसह 1164 धावा जमवल्या आहेत. टी-20 प्रकारातील पुरुष विभागामध्ये भारताचा सूर्यकुमार यादव, इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन, पाकचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहमद रिझवान आणि झिंबाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा यांच्यात या पुरस्कारासाठी चुरस राहिल. भारताच्या सूर्यकुमार यादवने या वर्षात टी-20 प्रकारात सर्वाधिक 68 षटकारांचा विक्रम नोंदवला आहे. महिलांच्या विभागात भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाने टी-20 प्रकारात फलंदाजीत सातत्य राखले आहे. गेल्या वर्षी मानधनाची टी-20 प्रकारात सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. मानधनाने टी-20 प्रकारात 25 चेंडूत जलद अर्धशतक नोंदवले आहे.