वृत्तसंस्था/ दुबई
बुधवारी नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने आपले अग्रस्थान अधिक भक्कम राखले आहे. तर आणि गोलंदाजांच्या मानांकनात लंकेचा फिरकी गोलंदाज हसरंगाने पहिले स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये भारताचा वेगवान डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने 23 वे स्थान घेतले आहे.
ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातील सूर्यकुमार यादवची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 5 सामन्यात जवळपास 200 धावांच्या स्ट्राईक रेटने 225 धावा जमविल्या आहेत. या मानांकन यादीत सूर्यकुमार यादव 869 मानांकन गुणासह पहिल्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवने भारताच्या प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्यात 25 चेंडूत 61 धावा झोडपल्याने त्याला आठवडा अखेरीस 6 गुण मिळाले. या यादीत पाकचा मोहमद रिझवान दुसऱया स्थानावर आहे. सूर्यकुमार यादव आणि रिझवान यांच्यात 39 गुणांचा फरक आहे. न्यूझीलंडचा कॉन्वे तिसऱया स्थानावर असून पाकचा कर्णधार बाबर आझम चौथ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार के. एल. राहुलने ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन अर्धशतके नोंदवल्याने तो आता 16 व्या स्थानावर आहे. भारताचे विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा हे अनुक्रमे या मानांकन यादीत 11 व्या आणि 18 व्या स्थानावर आहेत.
आयसीसीच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत लंकेचा फिरकी गोलंदाज हसरंगाने पहिले स्थान मिळवले आहे. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने 15 गडी बाद केले. हसरंगाने पहिल्यांदाच या मानांकन यादीत पहिले स्थान मिळवले असून अफगाणच्या रशीद खानला मागे टाकले आहे. भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 23 वे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाचे हॅझलवूड आणि झम्पा यांनी अनुक्रमे तिसरे आणि पाचवे स्थान घेतले आहे. भारताचा रविचंद्र अश्विन या मानांकन यादीत 13 व्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या आदिल रशीदने पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.
अष्टपैलूंच्या ताज्या मानांकन यादीत झिंबाब्वेचा सिन विलियम्सने पहिल्या दहा खेळाडूमध्ये स्थान मिळवले आहे. पाकच्या शदाब खानने 15 वे स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा आदिल रशीद आठव्या तर सॅम करन सातव्या स्थानावर आहे. झिंबाब्वेचा सिकंदर रझा चौथ्या स्थानावर आहे.