भारतीय ज्युडोका एल. सुशीला देवीने महिलांच्या 48 किलोग्रॅम इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. तिने मॉरिशसच्या प्रिस्किला मोरँडला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का दिला.
मणिपूरच्या 27 वर्षीय सुशीला देवीने इप्पॉनच्या बळावर जेरीस आणले. आता दक्षिण आफ्रिकेच्या मिशेला व्हाईटबुई हिच्याविरुद्ध सुशीला देवी सुवर्णपदकासाठी लढेल. प्रचंड ताकद व वेगात प्रतिस्पर्ध्यावर एकापेक्षा एक ठोसे लगावत राहण्याला ज्युडोत इप्पॉन म्हटले जाते. एखाद्या ज्युडोपटूने सलग 20 सेकंद प्रतिस्पर्ध्यावर दडपण राखले किंवा प्रतिस्पर्ध्याने स्वतःहून प्रयत्न सोडून दिले तर अधिक गुणांकन दिले जाते. मणिपूर पोलीस खात्यावर उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सुशीला देवीने दिवसाच्या प्रारंभी मालवीच्या हॅरिएत बोन्फेसविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत आगेकूच केली होती.
पुरुषांच्या 60 किलोग्रॅम रिपेचेजमध्ये विजय कुमारने स्कॉटलंडच्या डायलॉन मुन्रोला पराभूत करत कांस्यपदकाच्या लढतीतील आपले स्थान निश्चित केले. आता सायप्रसच्या पेत्रोस ख्रिस्तोडॉलाईड्सविरुद्ध त्याची कांस्यपदकाची लढत होईल. जसलीन सिंग सैनी देखील पुरुषांच्या 66 किलोग्रॅम गटात कांस्यपदकासाठी लढेल. त्याला उपांत्य फेरीत स्कॉटलंडच्या फिनले ऍलनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. 24 वर्षीय सैनीची कांस्यपदकासाठी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कॅत्झविरुद्ध रात्री उशिराने लढत होणे अपेक्षित होते.
सुचिका तारियाल देखील महिलांच्या 57 किलोग्रॅम रिपेचेज गटात दक्षिण आफ्रिकेच्या बेटेनबॅचला नमवत कांस्यपदकाच्या लढतीत पोहोचली. भारताने यापूर्वी 2014 ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत या प्रकारात 2 रौप्य व 2 कांस्यपदके जिंकली होती आणि तीच भारतीय ज्युडो संघाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.