बेंगळुरात सीसीबी पोलिसांची कारवाई ः अन्य तिघेजण ताब्यात
प्रतिनिधी/ बेंगळूर
जून महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तालिब हुसेन याला बेंगळुरातील श्रीरामपूर येथून अटक करण्यात आली होती. या पाठोपाठ रविवारी रात्री आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अख्तर हुसेन (वय 24) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा आसाममधील असून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बेंगळूरच्या तिलकनगर येथील अपार्टमेंटच्या तिसऱया मजल्यावरील फ्लॅटमध्ये अख्तर हुसेन वास्तव्यास असून तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय आणि राज्य गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. रविवारी रात्री 8 च्या सुमारास 30 पोलिसांच्या पथकाने छापा टाकून अख्तर हुसेन याला अटक करण्यात आली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या तिघा सहकाऱयांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात आहे. अख्तरला न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
डिव्हाईस, मोबाईल जप्त
अख्तरजवळून काही डिव्हाईस आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांची तपासणी करून अख्तर हुसेनने कोणकोणत्या वेबसाईट्सवर सर्च केले, कोणत्या फोन क्रमांकाशी संपर्क साधला याची माहिती सीसीबी पोलिसांकडून जमा केली जात आहे. फेसबुक, ट्विटर, टेलिग्रामवर भडकाऊ संदेशही अपलोड करून शांतता-सुव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न त्याने केल्याचे तपासातून समजते.
2 वर्षांपासून बेंगळुरात वास्तव्यास
जिहादी मनोवृत्तीचा असलेला अख्तर 2 वर्षांपासून बेंगळुरात वास्तव्यास होता. गरीब आणि बेरोजगार असणाऱया युवकांना आपल्या जाळय़ात अडकवून त्यांचे मनपरिवर्तन करत होता. त्यानंतर त्यांना दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहण्यासाठी प्रवृत्त करत होता, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
तिलकनगर पोलीस स्थानकात एफआयआर
कारवाईविषयी बेंगळूर शहर पोलीस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी माहिती दिली आहे. मूळच्या आसाम येथील अख्तर हुसेन याचे लष्कर-एöतोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासातून पुढे आले आहे. अख्तर आणि त्याच्यासोबत फ्लॅटमध्ये राहणारे तिघेजण फूड डिलिव्हरीचे काम करत होते. ते सर्वजण कोणामध्ये मिसळून राहत नव्हते. कोणाशी अधिक बोलणे टाळत होते. ते स्थानिक रहिवासी नसल्याची माहिती मिळाली होती. शिवाय त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय बेंगळुरात नसल्याने संशय बळावला होता. त्यामुळे रविवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून पोलीस अख्तरची वाट पहात होते. तो रात्री 8 वाजता फ्लॅटमध्ये परतल्यानंतर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात तिलकनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.