ऑनलाईन टीम / तरुण भारत :
परदेशात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेल्या संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला यश आले आहे. सर्फराज मेमन असे या संशयित दहशतवाद्याचे नाव असून, त्याला इंदौरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मेनन याने पाकिस्तान, चीन आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले आहे. तो मुंबईत दाखल झाला असून, त्याच्याकडून घातपाती कारवायांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतर्क राहा, अशा सूचना राष्ट्रीय तपास यंत्रणेने मेलद्वारे मुंबई पोलिसांना केल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांची झोप उडाली होती.
अधिक वाचा : कॉपीमुक्त अभियानाला हरताळ; शिक्षकांकडूनच बारावीच्या विद्यार्थांना कॉपीसाठी मदत
मेनन हा मूळचा मध्यप्रदेशातील इंदौरचा असून, त्याची ओळख पटावी, यासाठी एनआयएने मुंबई पोलिसांना केलेल्या मेलमध्ये मेननचे लायसन्स, व्हिसा आणि आधार कार्डची प्रतही पाठवली होती. त्याआधारे मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. अखेर आज सकाळी मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मेनन याला इंदौरमधून ताब्यात घेतले.