रवींद्र विठ्ठल नाईक सीबीआयच्या जाळय़ात ः आंतरराज्य टोळीतील चौघांवर कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभा सदस्य आणि राज्यपालपदाचे खोटे आश्वासन देऊन लोकांना 100 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॅकेटचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवला आहे. एफआयआरमध्ये कर्नाटकमधील बेळगावचा रविंद्र विठ्ठल नाईक, महाराष्ट्रातील लातूर येथील कमलाकर प्रेमकुमार बंडगर या दोघांसह दिल्ली-एनसीआरमधील महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि मोहम्मद एजाज खान यांची नावे आहेत. यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून मोहम्मद एजाज खान हा फरार झाला आहे.
पर्दाफाश करण्यात आलेल्या रॅकेटमधील ठकसेन सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. संशयित आरोपी कमलाकर बंडगर हा सीबीआयचा वरि÷ अधिकारी असल्याचे दाखवत होता. याशिवाय उच्चपदस्थ अधिकाऱयांशी आपली ओळख असल्याचेही तो लोकांना भासवत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. स्वतःचा प्रभाव दाखवण्यासाठी आरोपी बडय़ा नेत्यांच्या जवळ असल्याचे भासवून लोकांना फसवत असे. मात्र, सीबीआयने त्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.
विशेष सीबीआय न्यायालयाकडून जामीन
सीबीआयने या प्रकरणासंदर्भात अलीकडेच दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सात ठिकाणी शोध घेतला होता. या मोहिमेदरम्यान मोहम्मद एजाज खान नावाचा आणखी एक संशयित आरोपी सीबीआय अधिकाऱयांना हुलकावणी देऊन शोध मोहिमेदरम्यान पळून गेला होता. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये या प्रकरणाशी संबंधित पाचही आरोपींची नावे दिली आहेत, असे अधिकाऱयांनी सांगितले. सध्या विशेष सीबीआय न्यायालयाने अटक केलेल्या चारही जणांना जामीन मंजूर केला आहे.
‘सावज’ शोधण्याचा संदेश
या प्रकरणातील मुख्य संशयित बंडगर याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून नाईक, बुरा, अरोरा आणि खान यांना भक्कम पैसा मिळेल अशाप्रकारचे ‘सावज’ शोधण्याचा संदेश दिला होता. त्यादृष्टीने चौघेजण आपापल्या पातळीवर काम करत ओळखीतील काहींना हेरण्याचा प्रयत्न करत असत असा आरोप आहे. राज्यसभा सदस्य, राज्यपालपदी नियुक्ती, केंद्र सरकारची मंत्रालये आणि विभागांतर्गत विविध सरकारी संस्थांमध्ये अध्यक्षपदी नियुक्ती अशा जागांचे आमिष दाखवून मोठय़ा आर्थिक मोबदल्यात त्यांची फसवणूक करण्याचा एकमात्र गुप्त हेतू होता, असाही आरोप ठेवण्यात आला आहे.
फोन टॅप करून सापडला सुगावा
सीबीआयचे अधिकारी गेल्या काही आठवडय़ांपासून फोन इंटरसेप्टरद्वारे कॉल्स ऐकत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची नजर आरोपींवर होती. त्यांच्यातील व्यवहार अंतिम टप्प्यात असताना तो होण्यापूर्वीच सीबीआयने आरोपीला पकडले. आता त्याच्या इतर साथीदारांची नावेही समजली आहेत. सध्या 100 कोटींमध्ये डील होणार होती, अशी चर्चा आहे.