आजाराच्या निमित्ताने सशर्त जामीन मंजूर : पोलिसांच्या कारवाईबद्दल सर्वत्र अभिनंदन आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी
प्रतिनिधी /म्हापसा
धर्मांतरणाबाबत म्हापसा पोलीस स्थानकात ठोस तक्रार आल्यानंतर शिवोलीच्या डॉमनिक ई. मास्कारेन्हस याला म्हापसा पोलिसांनी गजाआड केल्यानंतर त्याने आरोग्याचे निमित्त सांगितल्याने त्याला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. गुरुवारची रात्र तेथे काढल्यावर शुक्रवारी दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्याची रवानगी कोलवाळ सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. त्यानंतर डॉमनिकने जामिनासाठी अर्ज केला असता म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 हजार रुपयांच्या सर्शत जामिनावर त्याची सुटका केली आहे.
कुचेली व खोर्ली म्हापसा येथील दोघांनी डॉमनिक याच्या विरोधात लेखी सादर केलेल्या हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरणाबाबतच्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी पास्टर डॉमनिक याला गुरुवारी रात्री शिवोलीतील त्याच्या घरी जाऊन अटक केली होती. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे राज्यभर खळबळ माजली होती.
घरातून संशयास्पद साहित्य जप्त
सडये शिवोली येथील फाईव्ह पिलर या बिलिव्हर्स संस्थेचे धर्मगुरू पास्टर डॉमनिक डिसोझा ई. मास्कारेन्हस याला अटक केल्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असल्याची माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली. यावेळी पोलिसांनी काही धार्मिक पुस्तके तसेच अन्य संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. यावेळी ठसे तज्ञानांही बोलाविण्यात आले होते. त्यांनीही सर्वत्र पडताळणी करून ठसे मिळविले आहेत.
पास्टर डॉमनिक याला म्हापसा जिल्हा इस्पितळात पोलीस कोठडी रुममध्ये ठेवण्यात आले होते. तेथेच तो उपचार घेत होता. या दरम्यान त्याच्या वकिलांनी जामीन अर्ज सादर केल्यानंतर म्हापसा जिल्हा न्यायालयात जामिनावर चर्चा होऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
रोगमुक्त करण्याच्या नावाखाली धर्मांतरण
डॉमनिक गेली अनेक वर्षे सडये येथे प्रार्थना सभेचे आयोजन करीत होता. प्रार्थनेत हिंदू भाविक उपस्थित राहायचे. या भागात नेहमी तणावाचे वातावरण दिसून येत होते. प्रार्थना सभेद्वारे आपण अनेकांना रोगमुक्त केल्याचा दावा डॉमनिक करीत असल्याने त्याच्या सभांना हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत असे. म्हापसा येथील रहिवासी शेटय़े यांनी डॉम्निक यांच्या विरोधात धर्मांतर करण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा आरोप करीत पोलिसांत तक्रार दाखल केल्याने म्हापसा पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
डॉमनिक याला अटक करून जिल्हा इस्पितळात भरती करण्यात आल्याचे बिलिव्हर्स पंथियांना समजल्यावर त्यांनी म्हापसा पोलीस स्थानक व इस्पितळाकडे गर्दी केली होती. म्हापसा पोलीस याकडे नियंत्रण ठेवून होते अशी माहिती निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
ही कारवाई पूर्वीच व्हायला हवी होती
डॉमनिकला अटक केल्यावर राज्यभर उलटसुलट कडव्या प्रतिक्रिया उमटल्या. धर्मांतरण करणाऱया डॉमनिकला यापूर्वीच अटक व्हायला पाहिजे होती. अशा व्यक्तीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. राज्य सरकारने याची दखल घेऊन गुन्हा अन्वेषण विभागातर्फे चौकशी करावी अशी मागणी अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
राज्यात धर्मांतर होते तर ती चुकीची बाब- अमित पाटकर
राज्यात जर धर्मांतर होतेय तर ती चुकीची बाब आहे अशी प्रतिक्रिया गोवा राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केली.
डॉमनिकच्या अटकेबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!
सखोल चौकशी करुन शिक्षा करावी : शैलेंद्र वेलिंगकर यांची जोरदार मागणी
भोळ्याभाबडय़ा हिंदू तसेच रोमन पॅथोलिक धर्मीय लोकांच्या भावनांशी खेळ करत त्यांचे बिलिव्हर्समध्ये धर्मांतरण, बाटाबाटी करणारा शिवोली येथील स्वंयघोषित ’गॉड मॅन’ डॉमनिक अटक केली ते फार बरे झाले असून त्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करत असल्याचे प्रतिपादन शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले आहे. सदर दाम्पत्यास कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शुक्रवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉमनिक आणि त्याची पत्नी या दांभिक दाम्पत्याने सडये शिवोली येथे फाईव्ह पिलर्स नावाने बेकायदेशीर चर्च स्थापन केली होती. त्यांच्याविरोधात गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक हिंदू संघटना आपापल्या पद्धतीने लढा देत होत्या. आता त्यांना यश प्राप्त झाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही, असे वेलिंगकर म्हणाले.
डॉमनिक-पत्नी दोघेही गुन्हेगार होते
सदर पती पत्नी दोघेही विवाहापूर्वी गुन्हेगार होते. वेगवेगळ्या गुह्यात त्यांना अटक झाली होती. अटकेत असतानाच एका तुरुंगात त्यांची भेट झाली होती. नंतर त्यांनी एकत्रितपणे हा धर्मांतरणाचा धंदा सुरू केला होता. त्याला खास करून गरीब कुटुंबातील अनेक महिला बळी पडल्या. त्यांच्या अंधविश्वासाचा फायदा घेत कित्येक महिलांना यांनी अक्षरशः लुटल्या व स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले. उशिरां का होईना, त्या साम्राज्याचा आता अंत झाला आहे, असे वेलिंगकर यांनी सांगितले.
फूट पाडली, धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न
या दाम्पत्याच्या नादी लागल्यामुळे अनेक हिंदू कुटुंबात फूट पडली. अनेकांचे घटस्फोट सुद्धा घडल्याची उदाहरणे आहेत. अनेकांनी स्वतः डॉम्निकच्या उपस्थितीत स्वतःच्या दारासमोरील तुळशीवृंदावने तोडून-फोडून टाकली. घरातील देवी देवतांची चित्रे-मूर्ती-तसबिरी नदीत फेकून दिल्या. गणेश चतुर्थी साजरी न करण्याबद्दल सुद्धा कित्येकांची मजल गेली. अशा या पापी डॉम्निकने धर्म आणि पंथाच्या नावाखाली उभी केलेली बेकायदेशीर चर्च जी तोडण्याचे आदेश यापूर्वीच टीसीपी, पंचायत संचालनालयाने दिलेले आहेत, तिच्यावरही सरकारने कारवाई करावी. त्याचबरोबर डॉमनिकच्या सर्व व्यवहारांची कसून चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी वेलिंगकर यांनी केली.
डॉमनिकच्या बायकोलाही अटक करा
- – समस्त हिंदूत्ववादी संघटनांची म्हापशात मागणी
- – राज्यात धर्मांतरण बंदी अंमलबजावणीची गरज
शिवोली येथील फाईव्ह पिलर चर्चचे प्रशासक आणि बिलिव्हर्सचे पास्टर डॉमनिक मास्कारेन्हस याची पत्नी जोयना हिलाही म्हापसा पोलिसांनी अटक करावी. धर्मांतराच्या नावाखाली डॉमनिकला विदेशातून कुठून पैसा येतो याची गोवा व केंद्र सरकारने चौकशी करावी. त्याची कागदपत्रे व संगणक सिलबंद करावे, अशा मागण्या हिंदूत्ववादी संघटनांतर्फे करण्यात आल्या आहेत. राज्यात सरकारने धर्मांतर विरोधी कायदा अमलात आणावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
गोवा मंदिर महासंघाचे प्रमुख जयेश थळी, चंद्रकांत भाई पंडित, शिवसेना गोवा राज्य माजी प्रमुख रमेश नाईक, हिंदू जनजागृती समिती प्रमुख शुभा सावंत, स्वराज्य गोमंतक प्रमुख प्रशांत वाळके, ‘भारत माता की जय’चे गोकुळदास शषांक कामत, महेश शिरगांवकर, सुरज गौतम आसरे यावेळी उपस्थित होते.
धर्मातरण बंदी कायदा आणावा : जयेश थळी
जयेश थळी म्हणाले की डॉमनिकवर अनेक तक्रारी आहेत, त्या सर्वांची चौकशी व्हायला हवी. त्याच्या अनेक बसेस असून त्यावरही कारवाई करायला पाहिजे. त्याच्या चॅनलवरही कारवाई करावी. सरकारने राज्यात धर्मांतर कायदा लागू करावा
डॉमनिकच्या विरोधात पुरावे गोळा करा : रमेश नाईक
रमेश नाईक म्हणाले की, गुरुवारची डॉमनिकची अटक नावापुरती होती. जर खरोखरच पोलिसांना त्याला अटक करायची असती तर त्याचे सर्व कागदपत्रे, किती लोकांना धर्मांतर केले, त्यांचे पत्ते त्यावर छापा घातला असता तर त्याचा संगणक, संपत्ती याबाबत सर्व माहिती पोलिसांनी गोळा केली असती.
खोटय़ा आश्वासनाना बळी पडू नका ः महेश शिरगांवकर
महेश शिरगांवकर म्हणाले की, अशा या धर्मांतराला जे कुणी बळी पडतात त्याच्याकडे व्हिलिंग पॉवर असे काही नाही. अशा खोटय़ा आश्वासनाना बळी पडू नका.
डॉमनिक विरोधात इतरांनीही तक्रार करावी : शुभा सावंत
शुभा सावंत म्हणाल्या, डॉमनिकने चालविलेले सर्व प्रकार हे एक षड्यंत्र आहे हे स्पष्ट आहे. त्याला बळी पडणारे अजून कोणी असतील तर त्यांनी पुढे येऊन पोलीस तक्रार करावी.
सीआयडी, ईडीद्वारे चौकशी करा : प्रशांत वाळके
प्रशांत वाळके म्हणाले की, डॉमनिक हा बोगस पास्टर आहे. दुसऱयांचे आजार बरे करण्याचा दावा करणारा हा भोंदू स्वतःचा आजार बरा का करू शकत नाही. त्याला कुठून फंड येतो याची चौकशी करावी.