पणजीत 53 व्या इफ्फीचा शानदार समारोप : आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीतील मान्यवरांची हजेरी,अनेक मान्यवरांचा गौरव, अनेकांना पुरस्कार प्रदान
- ’नो एंड’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेत्यासाठी दोन पुरस्कार
- ’आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ची डॅनिएला नवारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’साठी लव्ह डियाझ यांना विशेष ज्युरी पुरस्कार
- असिमिना प्रोड्रू ठरले पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक
- दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर’
प्रतिनिधी /पणजी
सिने जगताच्या वर्तमान आणि भविष्याचं प्रतिबिंब पडद्यावर उमटविणाऱया ’आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या स्पॅनिश चित्रपटाला 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या प्रति÷ित सुवर्ण मयुर पुरस्काराराने गौरविण्यात आले. या पुरस्कारांच्या घोषणेनंतर गेले नऊ दिवस देशविदेशांतील चित्रपट रसिकांना दर्जेदार चित्रपटांची मेजवानी देणाऱया इफ्फीची शानदार सांस्कृतिक सोहळ्याने सांगता झाली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री एल. मुरुगन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, यांच्यासह चिरंजिवी, अक्षय कुमार, आशा पारेख, शर्मन जोशी, आयुष्मान खुराना, इशा गुप्ता, प्रसुन्न चटर्जी, आदी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार उपस्थित होते.
भारतात प्रत्येकामध्ये प्रतिभा : ठाकूर
आपल्या स्वागतपर भाषणात मंत्री अनुराग ठाकूर यांनी, भारतात प्रतिभेची वानवा नाही. येथे प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिभा आहे, त्यांना केवळ संधी मिळण्याची प्रतीक्षा असते. इफ्फीमुळे कला क्षेत्रातील अनेकांच्या प्रतिभेला चालना मिळते, असे सांगितले. चित्रपटाचा आशय सशक्त असेल तर सहजपणे ते सर्वदूर पोहचतात आणि त्यांचे भरपूर कौतुकही होते. त्यामुळेच आमचे प्रादेशिक चित्रपटसुद्धा आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचले आहेत, असे ते पुढे म्हणाले.
‘नो एंड’ इराणी चित्रपटाला दोन पुरस्कार
अन्य पुरस्कारांमध्ये ’नो एंड’ या इराणी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता असे दोन प्रतिष्ठित रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाले. त्यातील दिग्दर्शनासाठी नादेर साईवार तर अभिनयासाठी चित्रपटातील मुख्य अभिनेता वाहिद मोबस्सेरी यांचा समावेश होता.
मारिन नवारो यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय
’आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारो यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे याच भूमिकेसाठी डॅनिएला यांना यापूर्वी लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
लव्ह डियाझ यांना स्पेशल ज्युरी पुरस्कार
फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना ’व्हेन द वेव्हज आर गॉन’ साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार प्रदान तर ’बिहाइंड द हेस्टॅक्स’ साठी असिमिना प्रोड्रू यांना ’सर्वोत्तम पदार्पणातील दिग्दर्शक’ आणि सिनेमॅटोग्राफर प्रवीण कांडेगुला यांना ‘बंदी’ या तेलुगु चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेल्या परीक्षक मंडळात इस्राएली चित्रपट दिग्दर्शक नादाव लॅपिड, अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, प्रेंच चित्रपट संकलक पास्कल शेवान्स, प्रेंच माहितीपट निर्माते झेवियर अँग्युलो बार्टुरेन आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा समावेश होता.
चिरंजीवी ’इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर’
अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी सर्वांचे आभार व्यक्त करताना त्यांनी, हा पुरस्कार आपणासाठी सर्वात मौल्यवान आहे, असे सांगितले. कोनिडेला शिवशंकर वराप्रसाद या नावाने आपणाला जन्म देणारे आई-वडिल आणि नंतर ’चिरंजीवी’ म्हणून जन्म देणारी चित्रपटसृष्टी यांचा आपण आजन्म ऋणी राहीन, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले. मध्यंतरी काही वर्षे आपण राजकारणात उतरलो. परंतु राजकारणात भ्रष्टाचार आहे. चित्रपटश्रृष्टीत तो नाही. त्यामुळे अभिनय सोडून राजकारणात उतरलेल्यांनी पुन्हा अभिनयाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
अनेक मान्यवरांचा गौरव
दरम्यान, इफ्फीच्या सोहळय़ास उपस्थित असलेले आशा पारेख, अक्षय कुमार, प्रसुन्न चटर्जी, आयुष्मान खुराना, राणा दुगाबली, मानसी चिल्लर, इशा गुप्ता, शर्मन जोशी यांच्यासह ’फाऊदा’ या वेब मालिकेचे निर्माते लिओर राझ आणि ऍव्ही इसाशेरॉफ आदींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. ’फाऊदा’ बेव मालिकेस भारतात मोठा प्रेक्षकवर्ग आणि त्यांचे प्रेमही लाभले ही गोष्ट भारावून टाकणारी आहे, अशी भावना राझ यांनी व्यक्त केली.
गोमंतकीय ’वसुधैव कुटुंबकम’ तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते : मुख्यमंत्री
‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात विश्वबंधूत्व तत्त्वज्ञानाचे आम्ही खंदे पुरस्कर्ते आहोत. म्हणूनच इफ्फीच्या माध्यमातून चित्रपटांशी संबंधित जगभरातील दिग्गज गोव्याकडे आकर्षित होत आहेत. दरवर्षी त्यांच्या संख्येत वाढही होत आहे. यावरून भारताला विश्वगुरू बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यात इफ्फी मोठा हातभार लावू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले गोवा राज्य म्हणजे एक परिपूर्ण फिल्म सिटीच आहे. सौजन्यशील आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध गोमंतकीय नागरिक संगीत, कला आणि संस्कृतीचेही तेवढेच पूजक आहेत. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याने संपूर्ण जगावरच मोहिनी घातली असून विविध क्षेत्रात वैश्विकतेचा दर्जा प्राप्त केला आहे. गोव्यात आयोजित होणारा इफ्फी अधिकाधिक आकर्षक व लोकाभिमुख व्हावा, येथे येणाऱया प्रत्येक सिनेप्रेमीस जास्तीत जास्त दिवस येथे राहण्याची इच्छा होऊन त्याची गोवा भेट संस्मरणीय व्हावी, एक वेगळा अनुभव घेऊन ते स्वगृही परतावे यादृष्टीने प्रत्येक वर्षी आम्ही नवनवीन सोयी, सुविधा, सहजता निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इफ्फी आणि गोवा यांचे संबंध अधिकाधिक दृढ व्हावे, प्रत्येक वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक व्हावा व जास्तीत जास्त प्रेक्षक, सिनेप्रेमी, चित्रपटसृष्टीशी संबंधित मान्यवर, प्रतिनिधींनी उपस्थिती लावावी यादृष्टीनेही आमचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नात या क्षेत्रातील तज्ञांनी आम्हाला अधिक मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.