Tarun Bharat

सुवेद पारकरचे पदार्पणात शतक

जाफर, सर्फराज यांचीही अर्धशतके

वृत्तसंस्था/ बेंगळूर

पदार्पणवीर सुवेद पारकरने नोंदवलेल्या शानदार नाबाद शतकामुळे उत्तराखंडविरुद्ध खेळणाऱया मुंबईने रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या दिवशी 3 बाद 304 अशी भक्कम स्थिती प्राप्त केली. अरमान जाफर (60) व सर्फराज खान (नाबाद 69) यांनीही अर्धशतके नोंदवली.

मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर सुवेद, अरमान व सर्फराज यांनी शानदार फलंदाजी करीत त्याचा निर्णय सार्थ ठरविला. सुवेदने जीवदानाचा लाभ घेत डावाची उत्तम बांधणी केली. यू-19 भारतीय संघातून खेळलेल्या 21 वर्षीय सुवेद पारकरने 218 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार व 2 षटकार नोंदवले. कर्णधार शॉ व प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्याप्रमाणे सुवेदनेही रणजी पदार्पणात शतक नोंदवले. सलामीवीर शॉ (21) व यशस्वी जैस्वाल (35) बाद झाल्यानंतर मुंबईची स्थिती 2 बाद 64 अशी होती. अशावेळी सुवेदने अरमान जाफरसमवेत तिसऱया गडय़ासाठी 112 धावांची भागीदारी मुंबईला सुस्थिती प्राप्त करून दिली. प्रभावी पदलालित्य दर्शविणाऱया सुवेदला नंतर सर्फराज खानकडून चांगली साथ मिळाली. आक्रमक फटकेबाजी करणाऱया सर्फराजने सुवेदसमवेत उत्तराखंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौथ्या गडय़ासाठी 128 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. दिवसअखेर पारकर 104 व सर्फराज खान 69 धावांवर खेळत होते.

पहिले दोन गडी बाद झाल्यानंतर जाफर व पारकर यांनी सावध फलंदाजी केली आणि जम बसल्यानंतर धावांची गती वाढवली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करीत उत्तराखंडच्या गोलंदाजांना दमविले. जाफरने 133 चेंडूत 60 धावांची खेळी करताना 7 चौकार, 2 षटकार मारले. त्याने लेगस्पिनर दिक्षांशू नेगीला षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले तर पारकरने आकाश मधवालला एकेरी धावेसाठी फटकावत पहिले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱया सत्रात मुंबईने केवळ एक गडी गमविला. नंतर पारकरने मधवाललाच स्क्वेअरलेग क्षेत्रात चौकार ठोकत पहिले शतक पूर्ण केले. सर्फराजच्या खेळीत 8 चौकार, एका षटकाराचा समावेश होता. शॉने पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकले. पण तो फार वेळ टिकला नाही. धपोलाने उपाहाराआधी जैस्वाललाही 35 धावांवर बाद केले. त्याने 6 चौकार ठोकले. उत्तराखंडच्या दीपक धपोलाने 53 धावांत 3 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई प.डाव 86 षटकांत 3 बाद 304 ः शॉ 4 चौकारांसह 21, जैस्वाल 6 चौकारांसह 35, अरमान जाफर 7 चौकार, 2 षटकारांसह 60, सुवेद पारकर खेळत आहे 104 (8 चौकार, 2 षटकार), सर्फराज खान खेळत आहे 69 (8 चौकार, 1 षटकार), अवांतर 15. दीपक धपोला 3-53.

बंगालच्या सुदीपचे नाबाद शतक (

रणजी करंडकाच्या अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत बंगालने झारखंडविरुद्ध खेळताना पहिल्या दिवशी युवा सुदीप घरामीच्या पहिल्या शतकाच्या बळावर 1 बाद 310 अशी भक्कम सुरुवात केली. सुदीपने याआधीच्या चार डावात 27 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. त्याने टेम्परामेंट व उत्तम तंत्राच्या जोरावर 204 चेंडूत नाबाद 106 धावा जमविल्या. त्यात 13 चौकार, एका षटकाराचा समावेश आहे. त्याच्यासमवेत दिवसअखेर अनुष्टुप मजुमदार 85 धावांवर खेळत असून त्यांनी दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 178 धावांची भागीदारी केली आहे. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (65) व अभिषेक रमण (41 दुखापतीमुळे निवृत्त) यांनी 132 धावांची सलामी देत भक्कम पायाभरणी केली होती.

पंजाब सर्व बाद 219

अलुर येथील उपांत्यपूर्व लढतीत पंजाबने मध्यप्रदेशविरुद्ध पहिल्या डावात सर्व बाद 219 धावा जमविल्यानंतर मध्यप्रदेशने बिनबाद 5 धावा जमविल्या होत्या. पंजाबच्या डावात अभिषेक शर्मा व अनमोलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी 47 तर सनविर सिंगने 41 धावा केल्या. मध्यप्रदेशच्या पुनीत यादव व अनभुव अगरवाल यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले.

कर्नाटक 7 बाद 213

अलुर येथेच सुरू असलेल्या अन्य एका सामन्यात उत्तरप्रदेशविरुद्ध खेळणाऱया कर्नाटकाने पहिल्या डावात 7 बाद 213 धावा जमविल्या होत्या. रविकुमार समर्थने अर्धशतक (57) नोंदवले तर उत्तरप्रदेशच्या सौरभ कुमारने 4, शिवम मावीने 3 बळी मिळविले.

Related Stories

क्लुजनरचा फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Patil_p

रामकुमारच्या विजयाने भारताला आघाडी

Patil_p

वासिम जाफर रणजी स्पर्धेतील पहिला ‘बारा हजारी’ मनसबदार

Patil_p

मियामी ग्रां प्रिमध्ये व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

2 नव्या आयपीएल संघांना 24 डिसेंबरला मंजुरी शक्य

Patil_p

यजमान पाकची मालिकेत विजयी सलामी

Patil_p