मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून : विविध विकास कामांची माहिती
वार्ताहर /मडकई
बांदोडय़ाच्या स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानाला नवा साज चढवताना त्यातील काही दुरूस्ती कामे हाती घेतली जाईल. भारतीय पद्धतीचा नवा जॉगींग ट्रक उभारून शारिरीक दृष्टय़ा खंगलेल्या रूग्णांना दिलासा मिळवून दिला जाईल. पुर्वीच्या जॉगींग ट्रकचे दुरूस्ती काम करताना खराब झालेले टर्फ काढून त्याजागी नवीन टर्फ घातल्यास नागरिकांना व्यवस्थित जॉगींग करता येईल. मैदानाच्या समपातळीवर नव्या ट्रकची निर्मिती करण्याचा मानस आहे. अंदाजे रूपये 1 कोटी खर्च करून बांदोडकर मैदानाचा विकास करण्यात येणार आहे. जनतेच्या मनातील मतदारसंघ कशा प्रकारे घडविण्यात येईल. याविषयीची माहिती विजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दै. तरूण भारतच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
साधारण हजारभर नागरिक या मैदानावर जॉगींग व खेळण्यासाठी येत असतात. 1978 मध्ये हा भूखंड पंचायतीकडे होता. त्यानंतर 2007 साली या मैदानाचा विकास घडवून आणलेला आहे. काशिमठ येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर नवरात्रोत्सवात गुजराती समाजातर्फे गरबा दांडीया खेळण्यात येत असतो. सोमवारपासून या कार्यक्रमाला सुरूवात होईल. त्यांचा हा सोहळा संपन्न झाल्यानंतर हे मैदान खेळाडूसाठी बंद ठेवले जाईल. साधारण तिन महिन्याच्या या कालावधीत स्व. बांदोडकर मैदानाचे दुरूस्ती काम हाती घेतले जाईल. दगडांचा जॉगींग टॅक व खराब झालेल्या टॅकचे ही दुरूस्तीकाम, नवीन टर्फ, बाकडय़ांवर ग्रेनाईट टाईल्स बसविण्यात येईल. रंगरंगोटी व नविन आरसे अशी विविध कामे हाती घेऊन या मैदानाला नवा साज चढविला जाईल, असे मंत्री श्री. ढवळीकर यांनी पूढे बोलताना सांगितले.
मैदानाच्या देखभाली करीता कामगार वर्ग, लाईट व वातानुकुलीत, नळ यांची बिले व किरकोळ खर्च मिळून साधारण महिन्याला रूपये 6 लाख खर्च येत असतो. हा खर्च पंचायतीच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणून बांदोडा पंचायतीच्या विनंती वरूनच या मैदानाचा ताबा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिलेला आहे. मैदानावरून गेलेली उच्च दाबाची विद्युत वाहीनी तुटल्यास आणि तिच्या संपर्कात कुणीही आल्यास अनेकांच्या जीवाला धोका संभवत आहे. त्यासाठी आधूनिक पध्दतीची विद्युत वाहिनी घालून हा प्रश्न निकालात काढला जाईल. यासाठीचे सर्व सोपस्कार पुर्ण झालेले आहे. लवकरच निविदा प्रसिध्द करून हे काम हाती घेतले जाइं&ल.
कवळे येथे पर्यटकांसाठी असलेले वसतीगृह जीर्ण झालेले आहे. ते जमीनदोस्त करून त्याजागी पार्कीग व रस्त्याचे रूंदीकरण करून या भागाचा विकास केला जाईल. पर्यंटकासाठी वसतीगृहाची आवश्यकताच नसल्याचा दावा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी माहिती देताना केला. कवळेचे शांतादुर्गा देवस्थान, रामनाथीचे रामनाथ, नागेशीचे नागेश देवस्थान, महालक्ष्मी देवस्थान, फर्मागुडीचे गोपाळ गणपती यासर्व देवस्थानांना अग्रशाळेची सुविधा असल्यामूळे पर्यटकांची सोय होत असते. वसतीगृह पाडल्यानंतर तिथे पर्यटकांच्या चालकांची सोय म्हणून सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. येथील रस्त्याच्या बाजूला बसून छोटे व्यवसाय करणाऱया गरिब गाळेधारकांसाठी दुकानाची सोय केली जाईल. तसेच वाहतुकीवर पडत असलेला ताण हलका करण्यासाठी पर्यायी नवीन रस्त्याची निर्मिती केली जाईल. कवळे मारुतीगड येथील स्मशानाच्या खाली असलेल्या जागेत 100 गाडय़ाचे पार्किंगची व्यवस्था केली जाईल. त्यामूळे सातत्याने भेडसावणाऱया वाहतुकीच्या समस्येवर कायम तोडगा निघेल अशी माहिती मंत्री ढवळीकर यांनी बोलताना दिली.
पोर्तुगीज काळापासून प्रसिद्ध असलेल्या रामनाथी पाटोच्या नाल्याचे दुरूस्ती काम हाती घेऊन पुर्ण केलेले आहे. येथील गटार व पाटो जवळ असलेला वारबट रस्ता खराब झालेला आहे. त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण नोव्हेंबरमध्ये करण्यात येतील. त्यामूळे वाहतुकदारांची सोय होईल. अंदाजे रूपये 2 कोटी या रस्त्यावर खर्च करण्यात येतील. पेरीगोल येथील मलनिस्सारण प्रकल्पाची जोडणी ग्राहकांना लवकरच दिली जातील. येथील रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण रूपये 70 लाख खर्चून हाती घेण्यात येईल. कंदबा बसस्टॅण्डचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी माहिती मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.