कोल्हापूर : उसाचा दर जाहीर न करताच ऊस तोड करून वाहतूक केल्याने आज आळते ता. हातकंणगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोडावत फॅक्टरीची ऊस वाहतूक रोखून ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. तसेच उसाचा दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करू नये, असा इशारा देत ऊस तोड बंद पाडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होत आहे. उसाचा दर किती घ्यायचा याचा निर्णय ऊस परिषदेमध्ये होणार आहे. तत्पुर्वीच घोडावत फॅक्टरीमार्फत दर जाहीर न करताच आळते परिसरात ऊस तोड सुरू केली होती. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उसाच्या गाड्या अडवल्या. ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून देऊन पुन्हा ऊस तोड करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.