ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा तसेच हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत विक्रमराव सावरकर यांच्या अर्धांगिनी स्वामिनी सावरकर यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जाज्वल्य विचारांचा वारसा त्यांचे पुतणे आणि डॉ. नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव सावरकर यांनी पुढे नेला. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांची. विक्रमराव सावरकर यांना त्यांच्या संघटन कार्यात स्वामिनी यांनी साथ दिली. प्रज्वलंत या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज त्यांनी सांभाळले. मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या उभारणीत तसेच संस्थेच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला. यशोगीत सैनिकांचे हे पुस्तक त्यांनी नुकतेच लिहिले होते.
स्वामिनी या त्यांचा मोठा मुलगा पृथ्वीराज याच्या कुटुंबासह पुण्यात राहत होत्या. सून मृणालिनी सावरकर या त्यांची सेवा करत होत्या. गेल्या आठवड्यात प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वार्धाक्य आणि त्यामुळे ढासळत चाललेली प्रकृती यामुळे त्यांच्या शरीराने औषधोपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सावरकरभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.