संशयितांच्या वकिलांकडून सीसीटिव्ही फुटेजची मागणी : तिघांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ
प्रतिनिधी/रत्नागिरी
Swapnali Sawant murder case : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत हिच्या खून प्रकरणात पोलिसांनी संशयितांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. त्यासंबंधी पोलिसांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिल्यास याचा उलगडा होईल., असा आरोप संशयिताचे वकील ॲड. एफ. एम. डिंगणकर यांनी न्यायालयापुढे केला. दरम्यान, सोमवारी संशयिताना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
न्यायालयापुढे युक्तीवाद करताना ॲड. डिंगणकर यांनी सांगितले की, स्वप्नाली सावंत प्रकरणात पोलिसांनी 8 तारखेला सुकांत सावंत याला ताब्यात घेतले होते. या दिवसापासून सुकांत सावंत हा पोलिसांच्याच ताब्यात आहे. पोलिसांकडून 11 तारखेला सुकांत सावंत व अन्य दोघांची अटक दाखवण्यात आली. त्यामुळे 8 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत पोलिसांकडून सुकांत सावंत याला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले. त्यासाठी पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही फुटेज मागवण्यात यावे अशी मागणी ॲड़ डिंगणकर यांनी न्यायालयात केली.
1 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी मिऱ्या येथील घरामध्ये तीचा गळा आवळून खून केला. तसेच यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. तसेच त्याची राख व हाडे समुद्रात फेकून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत (47), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (ऱा सर्व सडामिऱ्या रत्नागिरी) यांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध भादवि कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी संशयितांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी राहुल मनोहर चौत्रे याच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी न्यायालयापुढे सांगितले की, मृत स्वप्नाली सावंत हिचा मोबाईल अद्याप पोलिसांना आढळून आलेला नाही. तसेच इतर काही दुवे आहेत का याबाबत पोलिसांना तपास करावयाचा आहे. त्यामुळे संशयितांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी वाघमारे यांनी न्यायालयाला केली.
ॲड. डेंगणकर यांचा सवाल
बचाव पक्षाचे ॲड. एफ़ एम़ डिंगणकर यांनी न्यायालयापुढे सांगितले की, संशयितांना यापूर्वी 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 11 सप्टेंबर रोजी संशयितांना न्यायालयापुढे हजर करताना पोलीस कोठडीसाठी काही कारणे सांगण्यात आली होत़ी तीच कारणे पुन्हा एकदा पोलीस सांगत आहेत़ त्यामुळे आता पोलीस कोठडी घेऊन नेमके पोलीस काय तपास करणार असा सवाल डिंगणकर यांनी केला.
मृत स्वप्नाली सावंत हिचा मोबाईल तपास कामात अत्यंत महत्वाचा पुरावा आह़े तसेच संशयितांनी लांजा येथे नवीन मोबाईल खरेदी करून त्यात स्वप्नाली सावंत हिच्या मोबाईलचे सीमकार्ड टाकले होते. हे दोन्ही मोबाईल पोलिसांना हस्तगत करावयाचे आहेत़ तसेच या खून प्रकरणात काही पैशाची देवाणघेवाण झाली होती का याबाबत देखील तपास करणे अत्यावश्यक आह़े त्यामुळे संशयितांची पोलीस कोठडी अत्यंत गरजेची असल्याचे ॲड. तिवरेकर यांनी सांगितल़े दरम्यान मुख्य न्यायदंडाधिकारी राहुल चौत्रे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून तिनही संशयितांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ केली.