वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धेत शनिवारी भारताचा नेमबाज (कोल्हापूरचा रहिवासी) स्वप्नी कुसाळेने पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोजिशन नेमबाजी प्रकारात चौथे स्थान मिळविले. या कामगिरीमुळे स्वप्नील कुसाळेने आगामी पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या नेमबाजी कोटामध्ये स्थान पटकाविले आहे.
आगामी पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी नेमबाजी या क्रीडाप्रकाराकरिता कोटा सिस्टिम निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या कोटय़ामध्ये भारताचा नेमबाज भुवनेश मेंडीरट्टाने पुरुषांच्या ट्रप शुटींग नेमबाजी प्रकारातून तर पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारातून रुद्राक्ष बाळासाहेब पाटील यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. रुद्राक्षने या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक मिळविले आहे. महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत भारताची महिला नेमबाज रिदम सांगवानची कोटा पद्धतीत स्थान मिळविण्याची संधी थोडक्यात हुकली.
शनिवारी या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आणखी दोन पदकांची कमाई केली. 10 मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक कनिष्ठ गटातील नेमबाजी स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारताने 12 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कास्य अशी एकूण 32 पदकांची कमाई केली आहे.
कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारातील अंतिम फेरीत दुसरे स्थान मिळविताना 593 गुण नोंदविले. चीनच्या युकुनने 596 गुणासह पहिले स्थान तर कुसाळेने दुसरे स्थान पटकाविले.