‘मिसेस फलानी’मध्ये साकारणार 9 भूमिका
स्वरा भास्करला बॉलिवूडमध्ये आता मोठी संधी मिळाली आहे. स्वराने दिग्दर्शक मनीष किशोर आणि मधुकर वर्मा यांचा चित्रपट ‘मिसेस फलानी’ स्वीकारला आहे. महिलाकेंद्रीत कहाणींवरून अत्यंत सक्रीय असणाऱया स्वराचा हा चित्रपट देखील महिलाकेंद्रीत आहे. या चित्रपटात 9 वेगवेगळय़ा कहाण्या असून यात स्वराच्या 9 वेगवेगळय़ा भूमिका आहेत. स्वराची प्रत्येक भूमिका परस्परांपासून खूपच वेगळी असल्याचे दिग्दर्शक मनीष किशोर यांनी सांगितले आहे.
मिसेस फलानीची प्रत्येक कहाणी छोटय़ा शहरांमधील विवाहित महिलांच्या अव्यक्त इच्छा मांडणारी आहे. चित्रपटातील प्रत्येक कहाणीत स्वरा 35 ते 45 या वयोगटातील विवाहित महिलेची भूमिका साकारणार असल्याचे किशोर यांनी म्हटले आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘3 एरोज प्रॉडक्शन्स’ करत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये राकेश डांग, मनीष किशोर आणि मधुकर वर्मा तसेच सोफिया अग्रवाल यांचाही समावेश आहे.
दिग्दर्शक मनीष किशोर यांनी अनेक लोकप्रिय शोंची धुरा सांभाळली आहे. तसेच अनेक शोंसाठी कथालेखन देखील केले आहे. एक लेखक आणि निर्माता म्हणून त्यांचा पुढील चित्रपट ‘सुस्वागतम, खुशामदीद’ प्रदर्शनासाठी सज्ज असून यात पुलकित सम्राट आणि कॅटरीना कैफची बहिण इसाबेल मुख्य भूमिकेत आहे.
‘मिसेस फलानी’मध्ये 9 वेगवेगळय़ा कहाण्यांमध्ये नऊ वेगवेगळय़ा भूमिका साकारण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. आतापर्यंत सर्व चित्रपटांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु अशाप्रकारची संधी मिळेल अशी कल्पनाही केली नव्हती. प्रेक्षक अशा भूमिकांमध्ये मला पाहून चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे स्वराने म्हटले आहे.