Tarun Bharat

स्वर्गफळ हे स्वधर्माचे कोवळे मूळ आहे

Advertisements

अध्याय एकविसावा

भगवंत उद्धवाला म्हणाले, वेद हा माझ्या गुप्त ज्ञानाचे भांडार आहे पण तुझा अधिकार लक्षात घेऊनच तो मी तुला सांगितला आहे. हा गुह्यार्थ प्रगट केला तर नष्ट व अनाधिकारी असतील ते कर्ममार्गाची वाट सोडून कर्म व ब्रह्म या उभयतानाही मुकतील. हेच मोठमोठय़ा ज्ञानसंपन्न ऋषींनी लक्षात घेऊन वेदार्थ सांगण्याच्या शैलीत हा मुख्य अर्थ गुप्त ठेवून परोक्षवाद म्हणजे प्रवृत्तीमार्गच प्रतिपादन केलेला आहे. उद्धवा! सर्व लोकांच्या हितासाठी व लोकांना वळण लागावे म्हणून तसेच करणे उक्त आहे असे मलाही वाटते कारण, सर्वांना प्रवृत्तीमार्गच गोड लागतो. लोकांना वळण लावून देण्याकरिता मी अकर्ता असूनही कर्मे करतो आणि लोककल्याणाकरिता वेदाचे जे प्रवृत्तीपर मत आहे ते मी स्वतःही पाळतो. वेदाचे स्वरूप फार खोल, अतक्मर्य, अलक्ष्य आणि अगम्य आहे असे तू जाण. वेदांना शब्दब्रह्म म्हणतात त्यांचे रहस्य समजणे अतिशय कठीण आहे. ते परा, पश्यंती आणि मध्यमा वाणीच्या रूपात प्राण, मन आणि इंद्रियमय आहे. ते समुद्राप्रमाणे सीमा नसलेले, गूढ असून, त्याचा थांग लागणे अतिशय अवघड आहे. माझं वेदरूपी भाषण शब्दशः आणि अर्थशः फार खोल आहे, याबद्दल ब्रह्मदेवादिकांनासुद्धा भ्रम पडतो कारण, त्याची कल्पनाच त्यांना करवत नाही. समुद्र जसा हातांनी पोहून जाता येत नाही, तसा आपल्याच बुद्धीने वेदाचाही अर्थ कळत नाही. म्हणूनच अनेक ऋषिवर्यांनी नाना प्रकारच्या युक्तीप्रयुक्ती लढविल्या आहेत पण अशाने खराखुरा वेदाचा अर्थ कोणाच्याच हाताला येत नाही. कारण तो शब्दशः व अर्थशःही दुर्बोधच असतो. त्याच्या शब्दांची मांडणीच पुरती कोणाच्या हाती येत नाही, मग अर्थाची गोष्ट कशाला विचारावी? ती मनुष्यांनाच नव्हे, तर देवांनाही अगम्य आहे. पूर्वी हाच वेद अनुच्छिष्ट म्हणजे दुसऱया कोणीही पाहिला नव्हता, म्हणून ब्रह्मदेवाच्या हातून पाठ करविला पण त्यालाही तो नीटसा न समजल्यामुळे कर्माने तो कर्मठच होऊन बसला. ती अत्यंत सुंदर अशी कर्मक्रिया हा हा म्हणता शंखासुराने चोरून नेली. त्यामुळे ब्रह्मदेव वेदाची गोष्टच विसरून गेला, आणि सृष्टीनिर्मितीचे कार्यच बंद पडले.

त्या वेदांचा उद्धार करण्याकरिता मी शंखासुराचा वध केला आणि सारी वेदाची रास ब्रह्मदेवाला आणून दिली. अशा प्रकारे ते सारे वेद मी ब्रह्मदेवापुढे आणून ठेवले पण त्यालाही ते काही पहिल्याप्रमाणे स्मरेनात. तेव्हा तो बिचारा अगदी घाबरून जाऊन वेडाच होऊन बसला. त्या वेदविभागासाठी ऋषींनी आपले ज्ञान खर्ची घातले आणि त्याच्या शाखाउपशाखांचा पदच्छेद करण्यासाठी रावण पुढे आला. तरी उद्धवा! माझ्या वेदविभागाची इत्थंभूत वार्ता तत्त्वता कोणाच्याच हाताला लागली नाही. तोच मी वेदसंस्थापक श्रीहरि, लोकांना मर्यादेत ठेवण्यासाठी स्वतः श्रीव्यासाचा अवतार धारण करून सत्यवतीच्या पोटी जन्मास आलो. वेदविभाग करण्यात तो केवळ राजहंस होता, म्हणूनच त्याला ‘वेदव्यास’ असे म्हणतात. त्याने वेदार्थ प्रगट करून त्याचे चार प्रकार केले. वेद हा अर्थाच्या दृष्टीने अत्यंत गूढ आहे, पण शब्दाच्या दृष्टीने प्रगट आहे. ते शब्द म्हणजे वाणी. वाणी चार प्रकारच्या आहेत त्या मी स्पष्ट करून सांगतो ऐक. नादाचे पहिले स्फुरण म्हणजे घोषमात्र सूक्ष्म प्राण, त्याचे नाव ‘परावाणी’. तेच ओंकाराचे प्रथम लक्षण होय. तोच नादयुक्त प्राण अंतःकरणांत स्फुरण पावला म्हणजे त्याला ‘पश्यंती वाणी’ असे म्हणतात. ती विवेकलक्षणरूप आहे.

आणि नाभीपासून नाभिस्वराने कंठापर्यंत घुमघुमणारी जी वाणी ती ‘मध्यमा’ होय.

त्यानंतर अकार, उकार व मकार असा स्वर-वर्णयुक्त उच्चार, ज्यापासून ‘ओंकार’ प्रगट होतो, तीच ‘वैखरी वाणी’ होय. त्या वैखरी वाणीत शाखोपशाखांमध्ये जो अनंतरूपाने वेद भरलेला आहे, त्यालाही मर्यादा नाहीच.

याप्रमाणे वेद हा अमर्याद आहे. त्याचे चार विभाग करून स्पष्टीकरण केले, तरी तो लोकांना अतिशय दुर्बोधच झाला.

म्हणून त्याचे ‘उपवेद’ म्हणून आणखी विभाग केले.

क्रमशः

Related Stories

काँग्रेसला दिलासा!

Patil_p

आगामी आठवडा उत्साही आणि उत्सवी

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियातील वणव्याचा इशारा

Patil_p

अविरत हरिचे मनात चिंतन

Patil_p

एकवटते विरोधक!

Patil_p

मम भर्ता गरुडध्वज

Patil_p
error: Content is protected !!