लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी आयोजित चित्रप्रदर्शनाला प्रारंभ
कोल्हापूर प्रतिनिधी
‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची सचित्र माहिती मिळते. अकोल्याच्या (कै.) जयंत सहस्त्रबुध्दे यांनी एकत्रितपणे साकारलेला हा चित्ररूपी ठेवा आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे अकोल्याच्या (कै.) जयंत सहस्त्रबुध्दे यांनी साकारलेल्या ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ‘लोकमान्य’चे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, चीफ सिक्युरिटी ऑफिसर दीपक गुरंग, रिजनल मॅनेजर दिलीप पाटील, जनसंपर्क अधिकारी राजू नाईक, ब्रँड मॅनेजर उज्वला देसूरकर, असिस्टंट रिजनल मॅनेजर आर. डी. पाटील.उपस्थित होते.
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ प्रदर्शनात 402 ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांची छायाचित्रे व संपूर्ण माहिती पाहावयास मिळते. आजच्या युवा पिढीला आपल्या देशासाठी क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या त्यागाची माहिती मिळावी, यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर भरविली पाहिजेत. कोल्हापूर शहर आणि जिल्हय़ातील प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसह हे प्रदर्शन पाहावे, शाळा, महाविद्यालयांनीही आपल्या विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी पाठवावे, असे आवाहनही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी केली.
गोवामुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने म्हणाले, स्वातंत्र्यलढय़ाचा मी साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ’लोकमान्य’ने आयोजित केलेले ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ या प्रदर्शनात अनेक स्वातंत्र्यसैनिकांची माहिती आहे. अशा प्रदर्शनातून युवकांना उर्जा व प्रेरणा देण्याचे काम ‘लोकमान्य’ने केले. त्याबद्दल मी स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना धन्यवाद देतो.
‘लोकमान्य’च्या ग्राहक रोहिणी टोने म्हणाल्या, स्वातंत्र्य सैनिकांचे चित्रप्रदर्शन कोठे पाहायला मिळत नाही. त्यामुळे या चित्रप्रदर्शनून युवकांना निश्चित स्फुर्ती मिळेल. ‘लोकमान्य’चे रिजनल ऑफिसर दिलीप पाटील-वाकरेकर म्हणाले, ‘स्वातंत्र्याची चित्रगाथा’ हे प्रदर्शन यापुर्वी मुंबई व ठाण्यात भरवले होते. नवीन पिढीला स्वातंत्र्य सैनिकांची माहिती व्हावी म्हणून हे प्रदर्शन देशभर भरवले जाणार आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे 26 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. तरी शाळा-महाविद्याल, ‘लोकमान्य’चे सर्व ग्राहक, ठेवीदार आणि हिचिंतकांनी चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
प्रशासक डॉ. बलकवडे केले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माने यांचे चरणस्पर्श
स्वातंत्र्याची चित्रगाथा प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने यांना पहिल्यांदा दीपप्रज्वलन करण्याचा बहुमान दिला. त्यानंतर स्वतः दीपप्रज्वलन केले. याप्रसंगी त्यांनी माने यांचे चरणस्पर्श करून त्यांचे आर्शीवादही घेतले. प्रशासक डॉ. बलकवडे यांच्या साधेपणाची प्रदर्शनस्थळी चर्चा झाली.