वृत्तसंस्था/ लंडन
आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे (आयटीएफ) 2022 च्या टेनिस हंगामातील विश्व चॅम्पियन्स म्हणून पोलंडची टॉप सिडेड महिला टेनिसपटू इगा स्वायटेक तसेच स्पेनचा राफेल नदाल यांची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे या सर्वोत्तम पुरस्कारासाठी टेनिसपटूंच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला जातो. पुरुषांच्या विभागात स्पेनच्या नदालने 2022 च्या टेनिस हंगामात दोन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. प्रत्येक वर्षी चार ग्रँडस्लॅम स्पर्धा नियमितपणे खेळविल्या जातात. या पुरस्कारासाठी निवड करताना ग्रँडस्लॅम स्पर्धा, बिली जिन किंग चषक तसेच डेव्हिस चषक सांघिक टेनिस स्पर्धांचा समावेश असतो. एटीपीच्या ताज्या मानांकनात स्पेनचा अल्कारेझ हा पहिल्या स्थानावर असून स्पेनचा नदाल दुसऱया स्थानावर आहे. डब्ल्यूटीए टूरवरील मानांकनात इगा स्वायटेक अग्रस्थानावर आहे. आयटीएफतर्फे हा विश्व विजेत्याचा पुरस्कार नदालने आतापर्यंत पाच वेळा मिळविला आहे. नदालने 2008, 2010, 2017, 2019 आणि 2022 असा पाच वेळा हा पुरस्कार पटकाविला आहे. नदालने गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रॅंडस्लॅम तर जूनमध्ये प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. पोलंडच्या स्वायटेकने पहिल्यांदाच आयटीएफचा हा पुरस्कार मिळविला असून तिने 2022 च्या टेनिस हंगामात प्रेंच आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. आता आयटीएफतर्फे पुढील वर्षीच्या 8 जुलै रोजी पुरस्कार वितरण समारंभ लंडनमध्ये होणार आहे.
आयटीएफच्या विश्व चॅम्पियन्स पुरस्कारासाठी महिला दुहेरीत झेक प्रजासत्ताकच्या क्रेसीकोव्हा आणि सिनियाकोव्हा, पुरुष दुहेरीत राजीव राम आणि सॅलिसबरी, व्हिलचेअर महिला टेनिसमध्ये ग्रुट, व्हिलचेअर पुरुष टेनिसमध्ये कुनेडा आणि क्वाड व्हिलचेअर टेनिसमध्ये निलेश व्हिंक यांची निवड करण्यात आली आहे.