वृत्तसंस्था/मॅसन (अमेरिका)
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसीनॅटी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉपसिडेड इगा स्वायटेक तसेच पुरूषांच्या विभागात जेनिक सिनेर यांनी शानदार विजय नोंदवित तिसऱ्याफेरीत प्रवेश केला.
पुरूष एकेरीच्या सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने अमेरिकेच्या अॅलेक्स मिचेलसनचा 6-4, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. त्याच प्रमाणे पुरूषांच्या विभागात रशियाच्या मेदव्हेदेवला लिहेकाकडून हार पत्करावी लागली. लिहेकाने मेदव्हेदेवचा 7-6(7-2), 6-4 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ग्रीकच्या सित्सिपसने स्ट्रफचा 4-6, 6-4, 6-3 असा पडशा पाडत पुढील फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉमसनने सेबेस्टियन बाझचा 6-2, 6-4 असा पराभव करत पहिल्यांदा या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
महिलांच्या विभागात पोलंडच्या स्वायटेकने ग्रेचेव्हाचा 6-0, 6-7(8-6), 6-2 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. स्वायटेक आणि कोस्ट्युक यांच्यात तिसऱ्या फेरीतील लढत होईल. कोस्ट्युकने सनचा 6-3, 7-5 त्याच प्रमाणे 17 वर्षीय मीरा अॅन्ड्रीव्हाने इमा नेव्हारोचा 6-2, 6-2 असा पराभव केला. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अॅन्ड्रीव्हाने महिला दुहेरीमध्ये रौप्य पदक पटकाविले होते. रशियाच्या डायना स्नेडरने चीनच्या झेंग शुईचा 6-1, 6-4 असा फडशा पाडला.