गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जामकंडोरणा येथील विशाल सभेला मंगळवारी संबोधित केले आहे. या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला तसेच आम आदमी पक्षाचा नामोल्लेख टाळून आप नेत्याकडून वापरण्यात आलेल्या अपशब्दाचा मुद्दा उचलून धरला आहे. दोन दशकांपासून सत्तेत नसल्याने काँग्रेस आता लोकांच्या पाया पडून एक संधी देण्याची मागणी करत आहे. काँग्रेस प्रत्येकवेळी मला शिविगाळ करते, परंतु यंदा काँग्रेसने हे काम आउटसोर्स केले असल्याचे म्हणत मोदींनी आम आदमी पक्षाला लक्ष्य केले आहे.
आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून अपशब्द वापरत असल्याचे दिसून येते. पाटीदारबहुल सौराष्ट्राचे केंद्र असलेल्या जामकंडोरणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याला आगामी निवडणुकीसाठीचे राजकीय हत्यार म्हणून पाहिले जात आहे.
आप प्रदेशाध्यक्षाने पंतप्रधान मोदींना उद्देशून ‘नीच’ हा शब्द वापरला होता. या व्हिडिओवरून गुजरातमधील भाजप नेते आक्रमक असून त्यांनी आप आदमी पक्षाकडे इटालियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इटालिया यांच्यामुळे आम आदमी पक्ष गुजरातमध्ये अडचणीत आल्याचे चित्र आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या संबोधनात गुजरात आणि देशाच्या वेगवान विकासाचा उल्लेख केला आणि सौराष्ट्राच्या पाटीदार राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जामकंडोरणामध्ये काँग्रेसवर जोरदार टीका केली तसेच आम आदमी पक्षाला गलिच्छ राजकारणासाठी लक्ष्य केले.
गुजरातने वारंवार नाकारलेल्या लोकांनी मला त्रास देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. गुजरातची बदनामी करण्यासही हे लोक मागे राहिलेले नाहीत. प्रसंगी अशा लोकांनी न्यायालयाचा वापर करत गुजरातची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु गुजरातने या सर्व लोकांना नाकारून स्वतःचे स्थान निर्माण केल्याचे मोदी म्हणाले.