रामनाथ कोविंद यांच्याकडून दौपदी मुर्मू पदभार स्वीकारणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ 24 जुलैच्या मध्यरात्री संपल्यानंतर आज सोमवार, 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे. भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी सकाळी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथबद्ध होणार आहेत. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा शासकीय पातळीवरील शिस्तबद्ध कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी सोहळय़ाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. मुर्मू या राष्ट्रपतीपदावर निवडून आलेल्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 6 लाख 76 हजार 803 मते मिळाली तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना 3 लाख 80 हजार 177 मते मिळाली होती.
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयामुळे एनडीएमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. देशातील सर्व राज्यांतील नेत्यांनी त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे. आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर मुर्मू हय़ा संविधानाच्या सर्वोच्च पदाची शोभा वाढवतील. सोमवारी सकाळच्या सत्रात होणाऱया शपथविधी सोहळय़ामुळे काही सरकारी कार्यालये अंशतः बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन संसद भवनाचे बांधकामही समारंभादरम्यान थांबवावे लागणार आहे.
संसदेचे कामकाज दुपारी 2 वाजल्यापासून
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद भवनाच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेणार असल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक सोमवारी दुपारी 2 वाजता सुरू होईल. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सहसा सकाळी 11 वाजता सुरू होते. मात्र, शपथविधी सोहळय़ामुळे संसद अधिवेशनाचे कामकाज दुपारच्या सत्रात सुरू होईल.
शपथविधी सोहळा…
सकाळी 9.25 ः द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती भवनात ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात येईल.
9.50 ः द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून संसद भवनाकडे रवाना होतील.
10.03 ः आजी-माजी राष्ट्रपतींचा ताफा संसद भवनाच्या गेट क्रमांक 5 वर पोहोचेल.
10.05 ः दोघांचे स्वागत झाल्यानंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतरांसह ते सेंट्रल हॉलकडे जातील.
10.10 ः द्रौपदी मुर्मू, रामनाथ कोविंद यांचे सेंट्रल हॉलमध्ये आगमन. राष्ट्रगीत वाजवले जाईल.
10.15 ः नवनियुक्त राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा शपथ देतील.
10.20 ः उपस्थितांना आणि देशवासियांना संबोधून नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भाषण करतील.
10.45 ः आजी-माजी राष्ट्रपती संसद भवनातून पुन्हा राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील.
10.50 ः राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नव्या राष्ट्रपतींचा औपचारिक स्वागतपर समारंभ होईल.
11.00 ः मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती भवनातून निरोप दिला जाईल.