महिला गटातील युरो चषक स्पर्धा ः उपांत्यपूर्व सामन्यात बेल्जियमविरुद्ध 1-0 फरकाने विजय
वृत्तसंस्था/ मँचेस्टर (ब्रिटन)
2022 च्या महिलांच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत स्वीडनने शुक्रवारी झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत उपांत्य फेरी प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत स्वीडन आणि यजमान इंग्लंड यांच्यात उपांत्य लढत होणार आहे.
या सामन्यात स्वीडनचा महिला फुटबॉल संघ संभाव्य विजेता म्हणून ओळखला जातो. मात्र शुक्रवारच्या सामन्यात बेल्जियम संघाकडून त्यांना कडवा प्रतिकार झाला. या सामन्यात स्वीडनने एकमेव निर्णायक गोल खेळाच्या पूर्वार्धात नोंदविला. स्वीडनचा हा गोल स्टिना ब्लॅकस्टिनसने केला. या सामन्यात सहाव्या मिनिटाला स्वीडनने खाते उघडण्याची संधी गमविली. मात्र, बेल्जियमच्या गोलरक्षकाने स्वीडनचे आक्रमण परतावून लावले. बेल्जियम संघालाही पूर्वार्धात गोल करण्याच्या काही संधी उपलब्ध झाल्या होत्या. पण, त्यांना या संपूर्ण सामन्यात आपले खाते उघडता आले नाही.
गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीने ऑस्ट्रियाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. यजमान इंग्लंडने गेल्या बुधवारी स्पेनचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. फ्रान्स-हॉलंड यांच्यातील विजयी संघाविरुद्ध जर्मनीचा उपांत्य सामना होईल. स्वीडन आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य लढत येत्या मंगळवारी विम्बले स्टेडियमवर होणार आहे.