‘साब’ कंपनी उभारणार प्रकल्प
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वीडनमधील संरक्षण उत्पादन कंपनी ‘साब’ आता भारतात स्वतःचे कार्ल-गुस्ताफ एम4 शस्त्र निर्माण करण्यासाठी प्रकल्प स्थापन करणार आहे. या प्रकल्पातील उत्पादन 2024 मध्ये सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गोरगेन जोहान्सन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
कार्ल-गुस्ताफ एम4 ही रिकोलेस रायफल असून भारतीय सशस्त्र दलांनी याची ऑर्डर दिली आहे. नवा प्रकल्प जगभरात या यंत्रणेच्या वापरकर्त्यांसाठी याच्या उत्पादनासह घटकांना सहाय्य पुरविणार आहे. भारताव्यतिरिक्त अन्य कुठलाच देशात आम्ही अशाप्रकारचा प्रकल्प निर्माण केला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भारत आता मोठय़ा प्रमाणावर संरक्षण उत्पादनांची निर्यात करत आहे. आम्ही 2025 पर्यंत 1.75 ट्रिलियन डॉलर्सच्या संरक्षण उत्पादनांचे लक्ष्य बाळगले असून यात 350 अब्जांची निर्यात सामील असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी म्हटले आहे.
युक्रेनच्या संघर्षापासून कार्ल-गुस्ताफ शस्त्रप्रणालीबद्दल विविध देशांचे स्वारस्य वाढले आहे. या शस्त्रप्रणालीचा वापर रणगाडय़ांच्या विरोधात केला जाऊ शकतो. पुढील काळात आणखी काही देश रणगाडाविरोधी क्षमतांचा शोध घेणार असल्याचे जोहान्सन यांनी नमूद केले आहे.