प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव आणि मोदक यांचे समिकरण अतुट आहे. त्यातही उकडीचे मोदक लंबोदराला अधिक प्रिय. त्यामुळेच तांदुळ धुवून त्याची पिठी काढून, गुळ-खोबरे तयार ठेवून महिलांनी पूर्वतयारी केली आहे. मात्र, उकडीचे मोदक प्रत्येक महिलेला जमतीलच असे नाही. त्यामुळे बऱयाच ठिकाणी उकडीचे मोदक करून दिले जातात. त्यासाठीची पूर्व नोंदणी बऱयापैकी झाली आहे.
अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सदस्यांची संख्या मर्यादित झाली आहे. उत्सवाच्या तयारीला पुरेसा वेळ मिळतोच असे नाही. नोकरदार महिलांची तर अधिकच धावपळ होते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन केटरिंगचे काम करणाऱया महिलांनी मोदक करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
त्याप्रमाणेच बाजारपेठेत मिठाईच्या दुकानांमध्ये अनेक नमुन्यांचे व विशिष्ट स्वादाचे मोदक आले आहेत. उकडीचे, खव्याचे, तळलेले, मावा, केशरी, पांढरे अशा नमुन्यांचे मोदक उपलब्ध आहेत. खव्यांच्या मोदकांमध्ये तीन नमुने असून, मध्यम आकाराचे मोदक 280 रुपये, 320, 360 व 400 या दराने उपलब्ध आहेत. प्रसादासाठी सव्वा किलो मोदक उपलब्ध आहेत.
दुधाचा वापर करून पिस्ता मोदक, चॉकलेट मोदक, मँगो मोदक, केसर मोदक, काजू मोदक, तळलेले मोदक आहेत. उकडीचे मोदक 400 रुपये किलो असून, साधारण 28 ते 30 मोदक किलोला चढतात. ड्रायप्रुट्सचेही मोदक उपलब्ध आहेत. मोदकाची खरेदी साधारण एक दिवस आधी केली जाते. मंगळवारी त्यासाठीच मिठाईची दुकाने खुली राहणार आहेत. बुधवारपर्यंत मोदकांची खरेदी तेजीत होईल, असा अंदाज बाबुलाल राजपुरोहित यांनी व्यक्त केला.