फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटविरुद्ध सरळ सेट्समध्ये पराभव, ऑल अमेरिकन्स लढतीत गॉफचे आव्हान संपुष्टात
विम्बल्डन / वृत्तसंस्था
अव्वलमानांकित इगा स्वायटेकची फेब्रुवारीपासून चालत आलेली सलग 37 विजयांची मालिका रविवारी अखेर विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत खंडित झाली. अन्य सरफेसप्रमाणे ग्रास कोर्टवर खेळताना स्वायटेकला अधिक झगडावे लागते, ते येथे आणखी एकदा अधोरेखित झाले. स्वायटेकला महिला एकेरीतील तिसऱया फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटविरुद्ध सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. 37 व्या मानांकित कॉर्नेटने तिला 6-4, 6-2 असे नमवले.
‘मी आज माझ्या लौकिकाला साजेसे खेळू शकले नाही, याची मला पुरेपूर जाणीव आहे. येथे मी माझ्या रणनीतीबाबतच गोंधळले होते’, असे स्वायटेक याप्रसंगी म्हणाली. स्वायटेक दोनवेळची प्रेंच ओपन चॅम्पियन आहे. मात्र, ऑल इंग्लंड क्लब स्पर्धेत ती आजवर एकदाही अगदी चौथी फेरीही पार करु शकलेली नाही. या लढतीत कॉर्नेट केवळ 1 तास 33 मिनिटांच्या खेळात विजयी ठरली.
स्वायटेकला येथे मार्टिना हिंगीसचा 1997 मधील सलग 37 विजयांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी होती. ती देखील फोल ठरली. शनिवारी स्वायटेकच्या खेळात 33 अनफोर्स एररचा समावेश राहिला. स्वायटेकने मजबूत फोरहँडच्या बळावर 9 विनर्स नोंदवले. पण, तरीही विजय मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. दुसरीकडे, कॉर्नेटने या स्पर्धेत चौथ्या फेरीत पोहोचण्याची ही 2014 नंतर पहिलीच वेळ आहे. कॉर्नेटची पुढील फेरीतील लढत आता ऑस्ट्रेलियाच्या टॉमलजानोव्हिकविरुद्ध होणार आहे.
मागील विम्बल्डनमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारणाऱया टॉमल्जानोव्हिने येथे 2021 प्रेंच ओपन चॅम्पियन बार्बोरा क्रेजिकोव्हाचा 2-6, 6-4, 6-3 असा पराभव केला.
ऍमांडाची गॉफवर मात
स्पर्धेच्या महिला एकेरीतील अन्य एका लढतीत अमेरिकेची 20 वी मानांकित ऍमांडा ऍनिसिमोव्हाने आपलीच राष्ट्रीय सहकारी, 11 वी मानांकित कोको गॉफला सेंटर कोर्टवर 6-7 (4), 6-2, 6-1 अशा फरकाने मात देत ही ‘ऑल अमेरिकन्स’ लढत जिंकली.
मागील महिन्यात रोलँड गॅरोसवर फायनलमध्ये स्वायटेकविरुद्ध पराभव पत्करावा लागलेल्या 18 वर्षीय गॉफने येथे प्रारंभी 3-0 अशा फरकाने आघाडी मिळवली होती. पण, नंतर 20 वर्षीय ऍनिसिमोव्हाने फोर्सफुल बेसलाईन खेळ साकारत आघाडी प्राप्त केली. टायब्रेकरपर्यंत पोहोचलेला पहिला सेट अंतिम टप्प्यात गमवावा लागला असला तरी नंतर सलग दोन्ही सेट जिंकत तिने विजय खेचून आणला. विजयावर शिक्कामोर्तब होताच कोर्टवर पाठ टेकत दोन्ही हात उंचावत तिने आपला आनंद साजरा केला.
ऍनिसिमोव्हाची पुढील लढत फ्रान्सच्या हार्मोनीविरुद्ध होत आहे. हार्मोनीने यंदाच विम्बल्डनमध्ये आपले पदार्पण नोंदवले आहे. तिने मागील सामन्यात ब्रिटनच्या कॅटी बॉल्टरला 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये नमवले.
अन्य लढतीत स्पेनच्या पॉला बॅडोसाने झेकच्या पेत्रा क्विटोव्हाविरुद्ध 7-5, 7-6 (4) असा रोमांचक विजय मिळवला. सिमोना हॅलेपने पोलंडच्या मॅगदॅलेना प्रेच हिचा 6-4, 6-1 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत राफेल नदाल, किर्गिओस चौथ्या फेरीत
पुरुष एकेरीत निक किर्गिओसचा पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपसविरुद्ध मिळवलेला विजय लक्षवेधी ठरला. किर्गिओसने 6-7 (2), 6-4, 6-3, 7-6 (7) अशा फरकाने विजय संपादन केला. 2020 ऑस्ट्रेलियन ओपननंतर एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये चौथ्या फेरीत पोहोचण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. तो 2016 नंतर विम्बल्डन स्पर्धेतही प्रथमच चौथ्या फेरीत दाखल झाला. आता किर्गिओसची चौथ्या फेरीतील लढत अमेरिकेच्या ब्रॅन्डॉन नाकाशिमाविरुद्ध होत आहे.
अन्य एका लढतीत जॉन इस्नेरला सिन्नरविरुद्ध तिसऱया फेरीतील लढतीत पराभव पत्करावा लागला असला तरी त्याने यादरम्यान 13729 एसेसचा विक्रम नोंदवला. या सामन्यापूर्वी इस्नेर हा इव्हा कार्लोव्हिकच्या तुलनेत फक्त 4 एसेसनी मागे होता. त्याने दिवसातील चौथे व पाचवे एसेस तिसऱया गेममध्येच नोंदवत हा विक्रम आपल्या खात्यावर केला.
राफेल नदालने देखील आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारत इटलीच्या लोरेन्झो सॉनेगाचे आव्हान 6-1, 6-2, 6-4 अशा फरकाने संपुष्टात आणले. ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डे मिनॉरने ब्रिटनच्या लियाम ब्रॉडीचा 6-3, 6-4, 7-5 अशा फरकाने पराभव केला. फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटने नेदरलँडच्या झँडस्कल्पचे आव्हान 5-7, 6-2, 7-6 (7), 6-1 अशा फरकाने संपुष्टात आणले.