रीबाकिना, ओस्टापेन्को, कोर्दा, सित्सिपस, खचानोव्ह, लेहेका, पेगुला उपांत्यपूर्व फेरीत दाखल
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीतील जागतिक अग्रमानांकित पोलंडच्या इगा स्वायटेकचे आव्हान चौथ्या फेरीतच समाप्त झाले तर अमेरिकेच्या सातव्या मानांकित 19 वर्षीय कोको गॉफलाही स्पर्धेबाहेर पडावे लागले. कझाखस्तानची इलेना रीबाकिना, लॅटव्हियाची एलेना ओस्टापेन्को, जेसिका पेगुला यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर पुरुषांमध्ये कॅरेन खचानोव्ह, स्टेफानोस सित्सिपस, अमेरिकेचा 22 वर्षीय सेबॅस्टियन कोर्दा, बिगर मानांकित जिरी लेहेका यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. योशिहितो निशिओका, हय़ुबर्ट हुरकाझ, सहावा मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमे, 15 वा मानांकिन यानिस सिनर, बार्बरा क्रेसिकोव्हा यांचे आव्हान संपुष्टात आले.
मागील वर्ष स्वायटेकसाठी खूप चांगले गेले होते. तिने दोन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे एकूण आठ जेतेपदे, सलग 37 सामन्यांची विजयी घोडदौड आणि बराच काळ अग्रस्थानावर राहणे, या गोष्टी तिने मागील वर्षी साध्य केल्या. त्यामुळे या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये तिलाच संभाव्य विजेती मानले जात होते. मात्र या स्पर्धेत चौथ्या फेरीतच तिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. विम्बल्डन चॅम्पियन कझाखस्तानच्या 22 व्या मानांकित रीबाकिनाने तिला 6-4, 6-4 असे हरवून शेवटच्या आठमधील स्थान निश्चित केले. तिचा पराभव झाल्यामुळे स्वायटके व गॉफ ही अपेक्षित लढत आता होणार नाही.
गॉफ पराभूत, पेगुला विजयी
स्वायटेकप्रमाणे गॉफचेही आव्हान समाप्त झाले आहे. 2017 प्रेंच ओपन चॅम्पियन लॅटव्हियाच्या 17 व्या मानांकित एलेना ओस्टापेन्कोने गॉफला 7-5, 6-3 असा धक्का देत आगेकूच केली. आता रीबाकिना व ओस्टापेन्को यांच्यात उपांत्यपूर्व लढत होईल. चौथ्या फेरीच्या अन्य सामन्यात तिसऱया मानांकित जेसिका पेगुलाने सलग तिसऱयांदा उपांत्यपूर्व फेरी गाठताना 2021 ची पेंच ओपन चॅम्पियन बार्बरा क्रेसिकोव्हावर 7-5, 6-2 अशी मात केली. व्हिक्टोरिया अझारेन्का किंवा बिगरमानांकित झु लिन यापैकी एकीशी तिची पुढील लढत होईल.
कोर्दाचा हुरकाझला धक्का
पुरुष विभागात 13 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हने 31 व्या मानांकित योशिहितो निशिओकाचा 6-0, 6-0, 7-6 (7-4) असा पराभव करून आगेकूच केली. त्याची लढत अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्दाशी होईल. कोर्दाने दहाव्या मानांकित हय़ुबर्ट हुरकाझचा चुरशीच्या लढतीत 3-6, 6-3, 6-2, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव केला. कोर्दाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बिगरमानांकित जिरी लेहेकाने सहाव्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेला 4-6, 6-3, 7-6 (7-2), 7-6 (7-3) असे चकित करीत स्पर्धेबाहेर घालविले.
सिनर पराभूत
ग्रीसच्या सित्सिपसनेही आगेकूच करताना यानिक सिनरचा कडवा प्रतिकार मोडून काढला. तिसऱया मानांकित सित्सिपसने पाच सेट्सच्या झुंजार लढतीत सिनरवर 6-4, 6-4, 3-6, 4-6, 6-3 अशी मात केली. सित्सिपसने पहिल्या दोन सेटमध्ये वर्चस्व राखल्यानंतर सिनरने पुढच्या दोन सेट्समध्ये मुसंडी मारत बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये सित्सिपसने सहाव्या गेममध्ये निर्णायक ब्रेक मिळविला आणि नंतर क्रॉस कोर्ट फोरहँड फटक्यावर विजय साकार केला. या स्पर्धेची तीनवेळा उपांत्य फेरी गाठणाऱया सित्सिपसची उपांत्यपूर्व लढत बिगरमानांकित झेकच्या 21 वर्षीय जिरी लेहेकाशी होईल.
महिला दुहेरीत सानियाचे आव्हान समाप्त
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची ग्रँडस्लॅममधील महिला दुहेरीची कारकीर्द संपुष्टात आली असून ऍना डॅनिलिनासमवेत खेळताना तिला येथे दुसऱया फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. बिगरमानांकित ऍन्हेलिना कॅलिनिना व ऍलिसन व्हान उत्वांक यांनी त्यांच्यावर 6-4, 4-6, 6-2 अशी मात करीत तिसरी फेरी गाठली. पुढील महिन्यात होणाऱया दुबई ओपन स्पर्धेनंतर ती निवृत्त होणार असल्याने सानियाची ही ग्रँडस्लॅममध्ये महिला दुहेरीत खेळण्याची शेवटची वेळ ठरली. पुरुष दुहेरीत फ्रान्सच्या जेरेमी चार्डी व फॅब्रिस मार्टिन यांनी भारताच्या एन. बालाजी व एन. जीवन यांच्या 6-4, 6-4 असा पराभव केला.
सानिया मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णासमवेत खेळत असून या जोडीने दुसरी फेरी गाठली आहे. सानिया-बोपण्णाने ऑस्ट्रेलियाच्या वाईल्डकार्ड प्रवेशधारक जेमी फोरलिस व ल्युक सेव्हिले यांचा 7-5, 6-3 असा पराभव केला. सानियाने 2009 मध्ये महेश भूपतीसमवेत येथे मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविले होते.